आता एका क्लिकवर मिळणार रेशन कार्डवरील सर्व माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:34 IST2021-03-23T04:34:06+5:302021-03-23T04:34:06+5:30
रत्नागिरी : सार्वजनिक वितरण प्रणाली आता लोकाभिमुख झाली आहे. सामान्य नागरिकांना त्यांचा धान्याचा हक्क मिळावा, उद्देशाने शासनाने विविध ...

आता एका क्लिकवर मिळणार रेशन कार्डवरील सर्व माहिती
रत्नागिरी : सार्वजनिक वितरण प्रणाली आता लोकाभिमुख झाली आहे. सामान्य नागरिकांना त्यांचा धान्याचा हक्क मिळावा, उद्देशाने शासनाने विविध योजना लागू केला आहे. सार्वजनिक धान्य वितरण प्रणालीत नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुरवठा विभाग गेल्या काही वर्षांपासून हायटेक झाली आहे. त्याच्याच एक भाग म्हणजे आता हातात असलेल्या स्मार्ट फोनवरून रेशन कार्डधारकांना सर्व माहिती मिळावी, या उद्देशाने आता ‘मेरा राशन’ हे नवीन ॲपही सुरू करण्यात आले आहे.
या ॲपच्या माध्यमातून रेशन कार्डवर कुठले आणि किती धान्य उपलब्ध आहे. जवळचे दुकान कोणते आहे, शिधापत्रिकेची सद्यस्थिती काय आहे, ती शिधापत्रिका पात्र आहे की अपात्र आहे, याविषयी सर्व माहिती उपलब्ध होत आहे. त्यामुळे शिधापत्रिकाधारकांना ही माहिती समजण्यासाठी दुकानात जाण्याची गरज नाही. घरबसल्याही ही सर्व माहिती या ॲपवर मिळत आहे.
क्लिकवर मिळणार ही माहिती
सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत आता नागरिकांसाठी विवध प्रकारच्या सुविधा शासनाने उपलब्ध करून दिल्या आहेत. या लाभार्थ्यांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ सहजगत्या मिळावा, या हेतुने शासनाचा अन्न व पुरवठा विभागही आता हायटेक झाला आहे. त्यामुळे या प्रणालीअंतर्गत आता घरबसल्या रेशन कार्डधारकांना सगळी माहिती मिळणार आहे. या ॲपच्या माध्यमातून लाभार्थ्यांना मिळणारे धान्य, जवळपास असलेले रेशन दुकान, उचललेल्या धान्याची माहिती शिधापत्रिका पात्र की अपात्र, ही माहिती मिळणार आहे.
‘माय राशन’ हे अँड्राॅइड ॲप असून, रेशन कार्डधारकांना त्यांच्या मोबाइलवरून त्यांच्या रेशन कार्डविषयी सर्व माहिती अगदी घरबसल्या मिळणार आहे, तसेच या ॲपवर रेशन कार्डधारकांना मिळणारे धान्य, जवळ कुठले रेशन दुकान आहे आदी माहिती सहजगत्या मिळणार आहे. या आधीही ‘वन नेशन वन कार्ड’ हे ॲप उपलब्ध झाले आहे.
- सुशांत बनसोडे, प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी, रत्नागिरी
तक्रार ॲपवर नोंदवा
काही वेळा रेशन दुकानावर धान्य उपलब्ध असले, तरीही काही दुकानदार धान्य आले नसल्याचे सांगतात. याबाबतही या ॲपवर तक्रार नोंदविता येणार आहे.
धान्य वितरण प्रणालीत अजूनही काही त्रुटी आहेत, याबाबतही या ॲपवर तक्रारी नोंदविता येतात.