'विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षातून गेलेली घाण पुन्हा पक्षात येणार नाही याची खबरदारी घेतली जाईल, असे सांगत नितेश राणे यांनी विशाल परब आणि राजन तेली यांचे नाव न घेता पक्षप्रवेशाला विरोध केला आहे. ते सावंतवाडीत भाजप संघटन पर्व कार्यक्रमात बोलत होते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
गेल्या काही दिवसांपासून राजन तेली आणि विशाल परब हे भाजपमध्ये परतणार असल्याची चर्चा आहे. दोन्ही नेत्यांची नावे न घेता नितेश राणे यांनी पक्षप्रवेशाला विरोध करत पहिल्यांदाच भाष्य केले.
माजी आमदार राजन तेली व विशाल परब यांना नाव घेता नितेश राणे म्हणाले, "पुन्हा सावंतवाडी मतदारसंघात बाहेरची घाण नको. काही जण आमच्या नेत्यांवर टीका करून बाहेर पडले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संभाषण व्हायरल करण्याचे धाडस केले जाते. त्याना आता सोडायचे नाही."
'माझ्याकडे त्यांच्या कुंडल्या आहेत'
राणे पुढे म्हणाले, "ते पुन्हा पक्षात येण्याचे धाडस करणार नाही आणि आलेच तर त्याना सोडू नका. कोणाला तरी भेटतात आणि पक्षात येण्याची स्वप्ने बघत असतील तर दरवाजावर मी उभा आहे आणि यांच्या कुंडल्या ही माझ्याकडे आहेत हे लक्षात ठेवा", असा इशाराच त्यांनी यावेळी दिला.
तसेच येथील कार्यकर्ता सक्षम होण्यासाठी मी सदैव तुमच्या पाठीशी आहे, असा विश्वास राणे यांनी कार्यकर्त्यांना दिला.
त्याची परतफेड करावीच लागेल -नितेश राणे
"ज्या गावात उध्दवसेनेचा सरपंच असेल, त्या गावाला निधी नाही; बसा बोंबलत. एप्रिलनंतर यादीच घेऊन बसणार, मग कळेल आपण उध्दवसेनेमध्ये थांबून किती चूक केली ती. तुम्ही कितीही टिका करा, पण मी माझा पक्ष वाढवणारच. माझ्या नेत्यांना काय ते स्पष्टीकरण देईन, पण निधी देणार नाही. एवढ्यावर मी ठाम आहे", अशा शब्दात नितेश राणे यांनी विरोधी पक्षातील नेते आणि पदाधिकाऱ्यांना इशारा दिला.
नितेश राणे म्हणाले, "ज्या गावात महायुतीचा सरपंच नाही, त्या गावात निधी नाही; हे मी यापूर्वी बोललो आणि आता पण सांगतो आम्ही पक्ष वाढवण्यासाठी बसलो आहोत. जेव्हा महा विकास आघाडीचे सरकार होते तेव्हा ते आमच्या याद्या कशा फोकून द्याचे हे आम्ही सहन केल आहे. मग त्याची परतफेड करावीच लागेल."