रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानकासाठी नवीन निविदा, जूनी निविदा रद्द
By मेहरून नाकाडे | Updated: October 17, 2023 19:36 IST2023-10-17T19:36:02+5:302023-10-17T19:36:11+5:30
एमआयडीसीमधून निधी उपलब्ध करून देण्याचे पालकमंत्री उदय सामंतांचे आश्वासन

रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानकासाठी नवीन निविदा, जूनी निविदा रद्द
मेहरून नाकाडे, लोकमत न्यूज नेटवर्क, रत्नागिरी: राज्य परिवहन महामंडळाचे रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानकाचे काम गेली दहा वर्ष रखडले आहे. बसस्थानक बांधकामाच्या जुन्या ठेकेदाराची निविदा रद्द करण्यात आली असून, १४ ते १५ कोटींच्या नवीन कामाची निविदा प्रक्रिया येत्या तीन महिन्यांत पूर्ण केली जाणार आहे. यासाठी राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी एमआयडीसीमधून निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे.
गेल्या दहा वर्षांपासून रत्नागिरीकरांना हायटेक बसस्थानकाची प्रतिक्षा आहे. राज्यात झालेल्या सत्तांतरात सरकार बदलले, महागाईमुळे मंजूर निधीमध्ये वाढीवर निधीची मागणी यासह कोरोना संकटामुळे बसस्थानकाचे काम रखडले. ज्या ठेकेदारांनी हे काम घेतले होते, त्यांनी कामात दिरंगाई केली तसेच निधी वाढवून मागितल्याने ठेकाच रद्द करण्यात आला. मात्र पुन्हा याची फेरनिविदा काढण्यात येणार असून, या प्रक्रियेला तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यानंतर या कामाला पाच ते सहा महिने लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
पालकमंत्री उदय सामंत यांनी एमआयडीसीमधून निधी देण्यास मंजुरी दिली असून, या हायटेक बसस्थानकाचा प्रश्न आता लवकरच मार्गी लागेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.