कुष्ठरोगाचे नवे ५३ रूग्ण सापडल्
By Admin | Updated: January 30, 2015 23:17 IST2015-01-30T22:46:38+5:302015-01-30T23:17:30+5:30
सिंधुदुर्ग जिल्हा : पाच लहान मुलांचा समावेश, आरोग्य समिती सभेत बाब उघड

कुष्ठरोगाचे नवे ५३ रूग्ण सापडल्
सिंधुदुर्गनगरी : राष्ट्रीय कुष्ठरोग कार्यक्रमांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात जानेवारी अखेर कुष्ठरोगाचे नवे ५३ रूग्ण आढळले असून, त्यात पाच लहान मुलांचा समावेश आहे. शुक्रवारी आरोग्य समितीच्या सभेत ही बाब उघड झाली. जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीची सभा येथील बॅ. नाथ पै सभागृहात सभापती गुरूनाथ पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी सदस्य निकिता जाधव, भारती चव्हाण, संग्राम प्रभूगांवकर, जान्हवी सावंत, नम्रता हरदास, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूद्ध आठल्ये आदी उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जानेवारी अखेर आढळलेल्या कुष्ठरूग्णांवर औषधोपचार सुरू आहेत. यापूर्वीचे ४४ रूग्ण औषधोपचार घेत असून, उर्वरित ६२ जणांना उपचारमुक्त करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. ३० जानेवारी ते २४ फेबु्रवारी दरम्यान वेंगुर्ले, कुडाळ, मालवण व देवगड या चार तालुक्यात विशेष कुष्ठरोग शोधमोहिम राबविण्यात येणार आहे. उर्वरित चार तालुक्यात कुष्ठरोग निर्मूलन आठवडा राबविण्यात येणार आहे. सर्वच आरोग्य केंद्रात आयुर्वेदिक उपचार व्हावेत, अशी मागणी सभेत करण्यात आली. दहा ठिकाणी जिल्हा परिषदेची आयुर्वेदिक रूग्णालये आहेत. त्याशिवाय ज्या आरोग्य केंद्रांत आयुर्वेदिक डॉक्टर्स उपलब्ध आहेत, अशा सर्व केंद्रांमध्ये आयुर्वेदिक औषधे पुरविण्याचा निर्णय घेण्यात आला.आरोग्य सभापती पेडणेकर यांनी भेडशी आरोग्य केंद्रात औषध साठा नसल्याची माहिती सभागृहात दिली. परंतु आरोग्य अधिकारी डॉ. आठले यांनी पुरेसा औषध साठा असल्याची माहिती दिली. केवळ आशा स्वयंसेविका गरजेपेक्षा जास्त औषधे मागतात, त्यामुळे गैरसमज झाल्याचे ते म्हणाले. आंगणेवाडी यात्रेसाठी सर्व उपाययोजना केल्या आहेत. कुणकेश्वर यात्रेसाठीही उपाययोजना करण्यात येत आहेत. दोन्ही यात्रांसाठी प्रत्येकी दोन पथके तैनात करण्यात आली असून, या ठिकाणी स्वच्छ पाणी पुरवठा केला जाणार असल्याचे आरोग्य विभागाकडून यावेळी सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
निधी मागे जाणार?
जिल्हा परिषदेच्या आरोग्य केंद्र व उपकेंद्र बांधकामासाठी गतवर्षी १ कोटी २३ लाख रूपये प्राप्त झाले असून त्यापैकी अत्यल्प निधी खर्च झाला आहे. उर्वरित निधी मार्चअखेर खर्च न झाल्यास तो निधी शासनास परत करावा लागणार आहे.