रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेकडून माळ नाका येथील जुन्या व्यायामशाळेच्या जागेवर नवीन व्यायामशाळेसह आधुनिक व्यापारी संकुल उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्याच्या उभारणीसाठी येथील जुनी झालेली इमारत जमीनदोस्त करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी तात्पुरत्या स्वरूपात भाड्याने दिलेल्या जागा मोकळ्या करण्याचे आदेश देण्यात आले होते. संबंधित व्यावसायिकांना नोटिसाही बजावण्यात आल्या होत्या. रत्नागिरी नगर परिषदेला दरवर्षी घरपट्टी, पाणीपट्टी आणि इतर करातून सुमारे १५ कोटी रुपये उत्पन्न मिळते. मात्र, विविध विकासकामांसाठी निधीचा वाटा दिल्याने नगर परिषदेचा आर्थिक डोलारा काहीसा डळमळीत झाला आहे. अशा परिस्थितीत नवीन उत्पन्नाचे स्रोत निर्माण करण्यासाठी नगर परिषदेने पावले उचलली आहेत. तारांगण, मल्टिमीडिया शो आणि पेठ किल्ल्यातील शिवसृष्टीसारख्या प्रकल्पांमधून उत्पन्न सुरू झाले असून, आता माळ नाका येथील जागेच्या विकासातून भाड्याच्या स्वरूपात माेठ्या प्रमाणात महसूल मिळण्याची अपेक्षा आहे.त्यासाठी माळ नाका येथील रत्नागिरी नगर परिषदेच्या मालकीची जागा सध्या व्यायामशाळेच्या आवारात आहे. या ठिकाणी काही दुकानांना तात्पुरत्या स्वरूपात भाडेकराराने जागा देण्यात आल्या होत्या. आता या जागेवर नवीन व्यायामशाळेसह व्यापारी संकुल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा प्रकल्प रत्नागिरीच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासह स्थानिक नागरिकांसाठी नवीन सुविधा उपलब्ध करून देणारा ठरणार आहे.
उत्पन्नाचा मार्ग माेकळाजागेचा विकास पूर्ण झाल्यानंतर व्यापारी संकुलातील दुकाने आणि इतर सुविधांच्या भाड्यातून नगर परिषदेला नियमित उत्पन्न मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे नगर परिषदेच्या उत्पन्नातही भर पडणार आहे.