खेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत जोरदार हंगामा

By Admin | Updated: October 6, 2015 22:43 IST2015-10-06T22:43:50+5:302015-10-06T22:43:50+5:30

दोन्ही आमदार अनुपस्थित : पक्ष मोठा की आमदार, कार्यकर्ते गरजले

NCP's meeting at Khed was a major ruckus | खेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत जोरदार हंगामा

खेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत जोरदार हंगामा

खेड : खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ता बैठकीत मंगळवारी जोरदार हंगामा झाला़ हमरातुमरीवर आलेले कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यातही कमी पडले नाहीत़ आमदार पक्ष कार्यकर्त्यांना सहकार्य करीत नाहीत तसेच संघटनेच्या बळकटीकरणासाठी कोणतेही प्रयत्न करत नसल्याचे सांगत हा पक्षशिस्तीचा भग असल्याचा आरोपही या बैठकीत करण्यात आला़ पक्षश्रेष्ठी संदेश कोंडविलकर, जिल्हाध्यक्ष शेखर निकम आणि प्रदेश सरचिटणीस बाबाजी जाधव यांच्या उपस्थितीत झालेली ही बैठक वादळी झाल्याने आता खेड राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात कमालीची शांतता आहे.
मंगळवारी दुपारी ३. २५ वाजता सुरू झालेली ही बैठक कोणत्याही ठोस निणर््ायाअभावी सायंकाळी ५ वाजता संपवण्यात आली़ या बैठकीला दोन्ही आमदार उपस्थित राहणे आवश्यक असताना ते उपस्थित नसल्याबाबत शिंदे यांनी सर्वांना धारेवर धरले. पक्ष चालवायचा कोणी आमदारांनी की कार्यकर्त्यांनी असा सवालही त्यांनी उपस्थित केला़ यावर सर्व पदाधिकारी आणि पक्षश्रेष्ठी यांनी शांतच राहणे पसंत केले़
यावेळी भास्कर जाधव आणि बाबाजी जाधव यांच्या स्वतंत्र गटाचे या बैठकीत पुन्हा एकदा दर्शन झाले़ भास्कर जाधव गटाचे समर्थक मानले जाणारे युवकचे जिल्हाध्यक्ष राजू उर्फ बापू आंब्रे यांनी तर भास्कर जाधव यांच्यामुळेच खेड राष्ट्रवादी काँग्रेसला सुगीचे दिवस पहावयास मिळाल्याचे सांगितले़ यावर उपस्थित असलेल्या बाबाजी जाधव समर्थक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल झाली़ यावर कडी करत बाबाजी जाधव यांचे समर्थक असलेले पंचायत समिती सदस्य सचिन दळवी यांनी मात्र हे साफ खोटे आहे, एकटे भास्कर जाधव यांनी काहीही केलेले नाही तर बाबाजी जाधव आणि संजय कदम यांनी मोठी मेहनत घ्ोतली असून, त्याच्यामुळेच पक्षाला खेडमध्ये चांगले यश मिळाल्याचे सांगितले़
सचिन दळवी यांच्या या वक्तव्यामुळे राजू आंब्रे आणि सचिन दळवी यांच्यामध्ये चांगलीच जुंपली़ सचिन दळवी यांनी तर भास्कर जाधव यांनी मंत्री असताना आपल्यावर कारवाई केल्याचे स्मरण करून देताच सभागृहामध्ये जोरदार खडाजंगी झाली. एक मंत्री पक्षाच्या माणसाविरोधात कारवाई कसा काय करू शकतो, असे स्पष्ट करीत भास्कर जाधवाविरोधात दळवी यांनी भूमिका मांडली. पक्षश्रेष्ठी संदेश कोंडविलकर आणि शेखर निकम यांनी देख्ीाल शांत बसणे पसंत केले़ (प्रतिनिधी)

आमदार संजय कदमांना याबाबत विचारले असता त्यांनी मंडणगड येथील नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आपण मंडणगडमध्ये असल्याचे सांगितले आहे़ याच कारणास्तव आपण बैठकीला येऊ शकलो नाही, असे सांगत आपण याबाबत पक्षश्रेष्ठींना सांगितल्याचे कदम यांनी सांगितले़

Web Title: NCP's meeting at Khed was a major ruckus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.