जिल्ह्यात राष्ट्रवादीचा टक्का वाढतोय
By Admin | Updated: October 20, 2014 22:35 IST2014-10-20T22:10:48+5:302014-10-20T22:35:18+5:30
मोदी यांची रत्नागिरी येथे जाहीर सभा होऊनही जिल्ह्यातील मतदार भाजपच्या मागे राहिले नसल्याने काँग्रेस व भाजप या दोघांवर राष्ट्रवादीने कुरघोडी केली

जिल्ह्यात राष्ट्रवादीचा टक्का वाढतोय
धनंजय काळे -रत्नागिरी -विधानसभा निवडणूक निकालामध्ये जिल्ह्यात शिवसेनेखालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसने आपले स्थान राखले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रत्नागिरी येथे जाहीर सभा होऊनही जिल्ह्यातील मतदार भाजपच्या मागे राहिले नसल्याने काँग्रेस व भाजप या दोघांवर राष्ट्रवादीने कुरघोडी केली आहे. २००९ च्या तुलनेत प्रथमच या निवडणुकीत राष्ट्रवादीने आपली ताकद दाखवित झालेल्या एकूण मतदानापैकी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली. ही टक्केवारी ३० टक्के इतकी असल्याने जिल्ह्यातील घड्याळाची टीकटीक सुरूच आहे. गत निवडणुकीत राष्ट्रवादीने चिपळूणची जागा गमावली होती. यावेळीही तीच परिस्थिती कायम असली तरी राष्ट्रवादीने दापोली मतदारसंघात विक्रमवीर सूर्यकांत दळवी यांच्यावर विजय मिळवून तब्बल पंचवीस वषार्नंतर तेथील शिवसैनिकांना धनूष्य खाली ठेवायला भाग पाडले.
यंदा मात्र सर्व पक्ष स्वतंत्र लढले. राष्ट्रवादीने पाचही मतदारसंघात पाच उमेदवार उभे केले. त्यात राजापूर व रत्नागिरी येथे पक्षाने ताकद नसलेले उमेदवार उभे केल्याचे चित्र निकालानंतर स्पष्ट होत आहे. राजापूर विधानसभा मतदारसंघात अजित यशवंतराव यांच्यासारख्या स्थानिक तरूण नेत्याला उमेदवारीची संधी दिली. मात्र, त्यांना मिळालेल्या अल्प काळात त्यांनी आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला. येथे आमदार राजन साळवी यांच्यासमोर टिकणे अवघड होते. यशवंतराव यांना अपेक्षेपेक्षा कमी मते पडली. शिवसेनेच्या झंजावातात त्यांची अनामतही वाचू शकली नाही. मात्र, गेले काही महिने राष्ट्रवादीला राजापूरमध्ये एक नवा चेहरा लाभला असल्याने पुढे पक्षाला ताकद मिळण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
गेल्या काही निवडणुकीत राजापूर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसला साथ देऊन धाकट्या भावाची भूमिका बजावली. मात्र, यंदा राष्ट्रवादीला स्वतंत्र लढत देताना दोन्ही भूमिकेत राहावे लागले. राजापूरमध्ये यानिमित्ताने राष्ट्रवादीची ताकद पाहायला मिळाली. भविष्यात स्वतंत्र लढण्यासाठी या पक्षाला येथे नेटाने काम करावे लागेल. मात्र. पहिल्याच परीक्षेत राजापूरला राष्ट्रवादी नापास झाली.गत निवडणुकीत राष्ट्रवादीने रत्नागिरी मतदारसंघ जिंकला होता. माजी मंत्री उदय सामंत यांनी शिवसेनेत प्रवेश करून येथे राष्ट्रवादी व भाजप या दोघांना धक्का दिला. रत्नागिरीत राष्ट्रवादीची किमान ४० टक्के मते गृहीत धरली जात होती. येथे कुमार शेट्ये यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून काम केले होते. मात्र, उदय सामंत शिवसेनेत गेल्याने राष्ट्रवादीचा पालापाचोळा झाल्याचे जाणवले. अल्पसंख्य समाजाचे नेते बशीर मुतुर्झा यांना पक्षाने उमेदवारी दिली. त्यांना केवळ १४,१९५ मते मिळाली. राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भागात झालेल्या या निवडणुकीत राष्ट्रवादीला सन्मानजनक मते का मिळाली नाहीत, असा प्रश्न विचारण्याऐवजी उदय सामंत शिवसेनेत गेल्यानंतर त्यांनी सारी राष्ट्रवादीची फौज शिवसेनेत नेली, असा केला गेला तर आश्चर्य वाटायला नको. राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या गुहागरची जागा भास्कर जाधव यांनी स्वत:कडे राखली व कोकणात स्वत:चे नेतृत्व सिध्द केले आहे. त्यांनी पक्षाला ७२,२८५ मते मिळवून दिली. गुहागर हा एककाळ भाजपचा बालेकिल्ला होता. आता राष्ट्रवादीने या मतदारसंघातील कोपरा न कोपरा राष्ट्रवादीचा केल्याची प्रतिक्रिया येथे व्यक्त झाली. राज्यातील अनेक नेते जाधव यांना घरी पाठवण्याच्या घोषणा करीत असताना त्यांनी विनय नातू यांच्यावर ३२,७६४ मतानी नेत्रदीपक विजय मिळविला. सध्या रायगड व रत्नागिरीतील राष्ट्रवादीचा सर्वात मजबूत, सुरक्षित मतदारसंघ अशी प्रतिमा त्यांनी तयार केली आहे. यावेळी जाधव यांनी कोकणच्या नेतृत्त्वाची चुणूक दाखवत जिल्ह्यात सभा घेतल्या व शेवटचे काही दिवस प्रचारकार्याचा आढावा घेतला. मतदानाच्या दिवशीच सायंकाळी त्यांनी आपण ३० हजारपेक्षा अधिक मतानी विजयी होणार, असा विश्वास व्यक्त केला होता.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या जाधव यांनी त्यावेळी राष्ट्रवादीचा उमेदवार दापोलीचा आमदार असेल, असे सांगितले होते. त्यानंतर आघाडी तुटली व राष्ट्रवादीच्या यशासाठी जाधव यांनी मेहनत घेऊन संजय कदम यांना विजयी केले. सूर्यकांत दळवी यांचा षटकार कदम यांनी रोखला तो जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली. सेनेच्या बालेकिल्ल्यात कदम यांनी राष्ट्रवादीला प्रवेश दिला. त्यामागचे किमयागार कदम - जाधव असल्याने पहिल्याच लढाईत दापोलीची लढाई राष्ट्रवादीने जिंकली. ५२ हजार ५८५ मते मिळवत कदम यांनी तेथे काँग्रेसच्या उमेदवाराची अनामत घालविली.
जिल्ह्यातील महत्त्वाचा मतदारसंघ म्हणून चिपळूण - संगमेश्वरकडे पाहिले जाते. या मतदारसंघात ताकद असतानाही राष्ट्रवादीला पराभव स्वीकारावा लागला. यंदा सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष शेखर निकम यांना उमेदवारी मिळाली होती. निकम हे राष्ट्रवादीमधील मतभेद गाडून यंत्रणा यशस्वीपणे राबवित असताना त्यांना सहा हजार मतांनी पराभव स्वीकारावा लागला. येथे राष्ट्रवादीला स्वतंत्र लढताना ६९,६२७ मते मिळाली. भास्कर जाधव यांची जन्म व कर्मभूमी, माजी आमदार रमेश कदम यांच्या वर्चस्वाखालील शहरी भाग, जयंद्रथ खताते, दादा साळवी, अशोक कदम, शौकत मुकादम, अनिल दाभोळकर यांच्या अधिपत्याखालील हा भाग असल्याने येथे राष्ट्रवादीचा उमेदवार सुरक्षित वाटत असताना निकम यांना पराभूत व्हावे लागले. येथे पक्षाने ताकद दाखविली. मात्र, ते यशापर्यंत पोहोचू शकले नाहीत.