नाटे ग्रामस्थांनी सोडवला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न
By Admin | Updated: October 1, 2015 22:31 IST2015-10-01T22:31:30+5:302015-10-01T22:31:30+5:30
राजापूर तालुका : मुंबईकरांचा पुढाकार; गणेशोत्सव सत्कारणी, जलवर्धिनीचे मार्गदर्शन

नाटे ग्रामस्थांनी सोडवला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न
रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील नाटे येथील ग्रामस्थांनी श्रमदान आणि वर्गणीतून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला आहे. मुंबईतील जलवर्धिनी प्रतिष्ठान संस्थेच्या मार्गदर्शनाखाली भराडीणवाडी (मधलीवाडी) येथील ग्रामस्थांनी मुंबईकर चाकरमान्यांच्या पुढाकारातून दहा हजार लिटर क्षमतेची फेरोसिमेंटची टाकी अवघ्या तीन दिवसांत बांधून पूर्ण केली.
जलवर्धिनी प्रतिष्ठानचे विश्वस्त उल्हास परांजपे यांनी पाणी साठवण्याबाबत मार्गदर्शन केले. मुंबईतील वॉटर वर्क्स असोसिएशनचे ते सदस्य आहेत. महादेव घाडी यांनी त्यांची प्रात्यक्षिके अनेकदा पाहिली आणि आपल्या गावातही पाणी साठवण्याचा हा प्रयोग करायचे ठरवले. ती कल्पना त्यांनी गावातील मधलीवाडी नवतरूण मंडळासमोर ठेवली. मंडळातील तरुणांनीही ती उचलून धरली. वाडीतील घरांसाठी पाणी योजना तयार करण्याचे निश्चित करण्यात आले. मंडळाचे मुंबईतील कार्यकर्ते गिरीश शिंंदे यांच्यासह ग्रामस्थांनी त्यासाठी पुढाकार घेतला. गेल्या सहा महिन्यांपासून यासाठी वर्गणी गोळा करण्याचे काम सुरू होते.
जलवर्धिनीचे विजय खरे यांच्या मार्गदर्शनाखाली पाया आणि दहा हजार लिटर पाण्याची क्षमता असलेली टाकी बांधण्यात आली. फेरोसिमेंटने बांधलेली ही टाकी अवघ्या तीन दिवसांत उभी राहिली. यासाठी वाडीतील लोकांनी श्रमदानही केले. विहिरीतून या टाकीमध्ये पाणी साठवले जाणार असून, वाडीतील घरांना या पाण्याचा पुरवठा केला जाणार आहे. त्याकरिता विजेचा पंप तसेच जलवाहिन्या बसवण्याचे कामही वर्गणीतून केले जाणार आहे.
ग्रामपंचायतीवर अवलंबून न राहता ग्रामस्थांनी स्वत: पुढाकार घेऊन पाणी योजना राबवण्याचे ठरविल्याबद्दल सरपंच संजय बांधकर यांनी ग्रामस्थ तसेच मुंबईकर चाकरमान्यांची प्रशंसा केली. तसेच टाकीच्या बांधकामासाठी आलेल्या खर्चाकरिता ग्रामपंचायतीकडून शक्य तेवढे अनुदान देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. (प्रतिनिधी)
बांधकाम कारागिरांना प्रशिक्षण
फेरोसिमेंटची टाकी मुख्यत्वे पावसाचे पाणी साठवण्यासाठी बांधली जाते. मात्र, नाटे येथील मधलीवाडी ग्रामस्थांनी नळपाणी योजनेसाठी ही टाकी बांधली आहे. त्यामागे केवळ टाकी बांधणे एवढाच उद्देश नव्हता. शहरांमध्ये पावसाचे पाणी साठवणे अनिवार्य करण्यात आले आहे. गावांमध्येही यापुढच्या काळात पर्जन्यजल साठवण गरजेचे ठरणार आहे. त्याकरिता कमी खर्चाच्या फेरोसिमेंटच्या टाक्या बांधणे उपयुक्त ठरणार आहे. नाटे गावात घरांचे आणि अन्य बांधकाम करणाऱ्या कारागिरांना अशा टाक्या बांधण्याचे प्रशिक्षण मिळावे आणि त्यांनी गावात पावसाचे पाणी साठवण्यासाठी अशा टाक्या बांधून द्याव्यात, अशी अपेक्षा आहे. फेरोसिमेंट टाकीच्या बांधकामाचे प्रात्यक्षिक पाहिल्यानंतर गावातील अनेक कारागिरांनी मागणीनुसार तशा टाक्या बांधून देणार असल्याचे सांगितले.