अध्यक्षपदी बुवा गोलमडेंचे नाव
By Admin | Updated: February 23, 2016 00:19 IST2016-02-23T00:19:12+5:302016-02-23T00:19:12+5:30
जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक आज

अध्यक्षपदी बुवा गोलमडेंचे नाव
रत्नागिरी : जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवड बिनविरोध होणार असून, शिवसेनेचे बुवा गोलमडे यांचे नाव यासाठी निश्चित झाले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्षपद हे प्रथमच चिपळूणला मिळणार आहे.
तीन वर्षापूर्वी जिल्हा परिषदेच्या ५७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये शिवसेना २५, भाजप ८, राष्ट्रवादी १९, काँग्रेस ३ आणि बविआ २ असे सदस्य निवडून आले होते. सध्या जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबल :- शिवसेना - ३०, भाजप - ९, राष्ट्रवादी - १५, काँग्रेस - १ व बविआ - १ असे आहे.
जिल्हा परिषदेत शिवसेना-भाजप युतीचे बलाबल असताना केवळ महिला अनुसूचित जातीच्या आरक्षणामुळे पुरेसे पक्षीय बल नसतानाही अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनिषा जाधव यांच्या पारड्यात पडले होते. त्यामुळे अडीच वर्षे युतीला अध्यक्षपदाची प्रतीक्षा करावी लागली होती. मात्र, त्यानंतर आमदार राजन साळवी यांचे समर्थक जगदीश राजापकर यांच्या रुपाने लांजा तालुक्याला प्रथमच जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद लाभले होते. राजापकर यांचा अध्यक्षपदाचा सव्वा वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांनी जानेवारी, २०१६ शेवटच्या आठवड्यात राजीनामा दिला होता. त्यानंतर प्रभारी अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश शेवडे हे कार्यरत आहेत.
त्यानंतर लाल दिव्याच्या गाडीसाठी इच्छुकांची धावपळ सुरु झाली होती. माजी आमदार सूर्यकांत दळवी समर्थक जिल्हा परिषद सदस्या स्मीता जावकर आणि चिपळूणचे बुवा गोलमडे यांच्या नावाची चर्चा सुरु होती. मात्र, गेल्याच महिन्यात मुंबईत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीमध्ये चिपळूणला अध्यक्षपद देण्यावर शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे बुवा गोलमडे यांना अध्यक्षपद मिळणार हे निश्चित असल्याने त्यादृष्टीने चिपळूण तालुक्यातील शिवसैनिकांनी जोरदार तयारीही केली आहे. त्यामुळे उद्या शिवसेनेचे गोलमडे यांच्या गळ्यात जिल्हा परिषद अध्यक्षपदाची माळ पडणार आहे. यामुळे चिपळूण तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. (शहर वार्ताहर)