नाेकरी, व्यवसायाच्या संधीमुळे पाॅलिटेक्निककडे विद्यार्थ्यांचा ओढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:34 IST2021-09-18T04:34:23+5:302021-09-18T04:34:23+5:30
मेहरुन नाकाडे लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : शासकीय तंत्रनिकेतनच्या अभ्यासक्रमानंतर व्यवसाय/नोकरीची संधी तर उपलब्ध होते, शिवाय पदवीसाठी थेट दुसऱ्या ...

नाेकरी, व्यवसायाच्या संधीमुळे पाॅलिटेक्निककडे विद्यार्थ्यांचा ओढा
मेहरुन नाकाडे
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : शासकीय तंत्रनिकेतनच्या अभ्यासक्रमानंतर व्यवसाय/नोकरीची संधी तर उपलब्ध होते, शिवाय पदवीसाठी थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश मिळतो. सीईटी देण्याची कटकटही भासत नसल्यानेच शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा ओढा अधिक आहे. जिल्ह्यात एकमेव शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय असून, ४८० प्रवेश क्षमता असताना ९०० अर्ज प्राप्त झाले आहेत.
जिल्ह्यात खासगी अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत, परंतु शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय मात्र एकमेव आहे. इलेक्ट्रीक, काॅम्प्युटर, मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्राॅनिक्स अभ्यासक्रमाचे एकूण आठ वर्ग असून इलेक्ट्रिक, काॅम्प्युटर, मेकॅनिकल, सिव्हिल इंजिनीअरिंगच्या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांचा ओढा अधिक आहे. पदविका अभ्यासक्रमानंतर ९० टक्के विद्यार्थी पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतात. या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी सीईटी परीक्षा द्यावी लागते. पदविका पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना पदवीच्या थेट दुसऱ्या वर्गात प्रवेश मिळत असल्याने अनेक विद्यार्थी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात प्रवेश घेतात. तीन वर्षांच्या अभ्यासक्रमामुळे पदवीचा पायाही भक्कम होतो.
संगणक, इलेक्ट्रिककडे विद्यार्थ्यांचा ओढा
शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात इलेक्ट्रिक, काॅम्प्युटर, मेकॅनिक, सिव्हिल तसेच इलेक्ट्राॅनिक्स विषयाचे एकूण सहा वर्ग आहेत. परंतु विद्यार्थ्यांचा सर्वाधिक ओढा हा इलेक्ट्रिक, काॅम्प्युटर, मेकॅनिक, सिव्हिलच्या अभ्यासक्रमासाठी अधिक आहे. या वर्षीपासून विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार ‘मेकॅट्राॅनिक्स’ हा नवा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. शिवाय शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयही तंत्रनिकेतन महाविद्यालय परिसरात सुरू होत असल्याने विद्यार्थ्यांसाठी जणू नवी संधी उपलब्ध झाली आहे. नोकरी, व्यवसायाच्या संधीमुळे या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा ओढा अधिक आहे.
विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद
पदविका अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी ९० टक्के विद्यार्थी पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतात. तीन वर्षांच्या पदविका अभ्यासक्रमानंतर पदवीसाठी थेट दुसऱ्या वर्षाला प्रवेश मिळतो. शिवाय तीन वर्षांच्या अभ्यासक्रमामुळे पदवीच्या अभ्यासक्रमाचा पाया भक्कम होतो. दहा टक्के मुले मात्र नोकरी, व्यवसायाकडे वळतात.
- ए.एम. जाधव, प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, रत्नागिरी
व्यवसाय/नोकरीसह शिक्षणाचीही संधी
बारावीनंतर अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी सीईटी परीक्षा द्यावी लागते. सीईटीचे गुण ग्राह्य धरले जातात. त्यापेक्षा दहावीनंतर तीन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केल्यास थेट पदवीच्या दुसऱ्या वर्गात प्रवेश मिळतो. सीईटी परीक्षेपेक्षा हा मार्ग सोपा आहे. शिवाय पुढील अभ्यासक्रमही सोपा जातो.
- अमान फोंडू, पावस
पदविका अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर व्यवसाय/नोकरीची संधी उपलब्ध होते. महाविद्यालय परिसरातच कॅम्पस मुलाखती होत असतात. विविध नामवंत कंपन्या मुलाखतीसाठी येत असल्याने नोकरीची संधी उपलब्ध होते. नोकरी, व्यवसायाऐवजी पुढील शिक्षणाचीही संधी असल्याने तंत्रनिकेतन अभ्यासक्रम योग्य मार्ग आहे.
- सिद्धेश पाटील, रत्नागिरी
रोजगार, काैशल्याभिमुख शिक्षण यापुढे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे आयटी, ईएनटीसी अभ्यासक्रम फायदेशीर आहे. पदविका अभ्यासक्रमामुळे रोजगाराची संधी तर आहे, शिवाय कमी खर्चात पूर्ण होणारा अभ्यासक्रम आहे. लहानपणापासून अभियंता बनण्याचे स्वप्न भविष्यात या माध्यमातून पूर्ण होणार आहे.
- स्वप्नाली रसाळ, जयगड
रोजगाराची हमी
कोरोनामुळे गेल्या दीड वर्षात ऑनलाइन, डिजिटलचे महत्त्व वाढले आहे. भविष्याचा वेध घेत अनेक विद्यार्थ्यांचा इलेक्ट्रिक, संगणक, मेकॅट्राॅनिक्स विषयासाठी विद्यार्थ्यांचा ओढा अधिक आहे. त्यानंतर मेकॅनिक, सिव्हिल अभ्यासक्रमासाठी पसंती दर्शविली आहे. एकूण ४८० जागांसाठी ९०० अर्ज प्राप्त झाले आहेत.
पदविका अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर पदवी अभ्यासक्रमाचा प्रवेश सुलभ होतो. बारावीनंतर प्रवेश घेताना ‘सीईटी’ परीक्षा द्यावी लागते. बारावी परीक्षेत कितीही गुणवत्ता असली तरी सीईटीचे गुणांकन ग्राह्य धरले जात असल्यामुळे पदविकेनंतर थेट पदवीच्या दुसऱ्या वर्षालाच प्रवेश मिळतो. शिवाय तीन वर्षांत अभ्यासक्रम सुलभ होतो.
शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात एकूण वर्ग असून प्रत्येक वर्गासाठी ६० मिळून एकूण ४८० प्रवेश क्षमता आहे. ११२६ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती.