‘नाईक फाऊंडेशन’ बनली गरिबांसाठी वरदायी
By Admin | Updated: March 11, 2016 00:02 IST2016-03-10T23:09:17+5:302016-03-11T00:02:21+5:30
समाज परिवर्तनाचा ध्यास : अवघ्या पाच मुलांना घेऊन सुरु झाली संस्था अन्.- लोकमतसंगे जाणून घेऊन

‘नाईक फाऊंडेशन’ बनली गरिबांसाठी वरदायी
मेहरुन नाकाडे -- रत्नागिरी ढींूी, ऊ्र२ू्रस्र’्रल्ली & हङ्म१‘ या त्रिसूत्रीचा वापर करुन विचारांच्या आणि कृतीच्या माध्यमातून ‘एम. एस. नाईक फाऊंडेशन’ या शैक्षणिक संस्थेची स्थापना १९८५ साली करण्यात आली. अवघ्या पाच मुलांना घेऊन महंमद सिद्दीक नाईक व सईदा महंमद सिद्दीक नाईक या दाम्पत्याने संस्थेची स्थापना केली. सर्वसामान्य कुटुंबातील मुलांसाठी इंंग्रजी माध्यमांची शाळा सुरु करुन संस्थेने समाज परिवर्तनाचा जणू काही ध्यासच घेतला होता.
१९८५ साली रत्नागिरी जिल्हा हा शैक्षणिक व सामाजिक दृष्टीकोनातून वंचित समजला जात असतानाच नाईक दाम्पत्याने एम. एस. नाईक फाऊंडेशनच्याद्वारे लावलेल्या रोपट्याचा आता वटवृक्ष झाला आहे. दरवर्षी शालांत परीक्षेचा १०० टक्के निकाल हे संस्थेचे वैशिष्ट्य आहे. बदलत्या काळानुसार स्मार्ट क्लासरुम, मॅथस् लॅब यासारख्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर संस्थेने केला आहे. जनजागृती फेऱ्या, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धेचे आयोजन, एडस् जनजागृती रॅली, पल्स पोलिओ निर्मूलन, स्त्रीभ्रूण हत्या, जातीभेद, पर्यावरण वाचवा यासारख्या सामाजिक पश्नांवरही संस्थेकडून विविध उपक्रमांचे आयोजन वेळोवेळी केले जाते. सामाजिक व शैक्षणिक कार्याची नोंद घेत संस्थेला विविध पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.
सामाजिक परिवर्तनाचा व जाणीवेचा एक भाग म्हणून वंचित व समस्याग्रस्त महिलांसाठी कौटुंबिक सल्ला केंद्राची स्थापना संस्थेने केली आहे. गेल्या दहा वर्षापेक्षा अधिक कालावधीमध्ये समुपदेशनाद्वारे उभयतांमध्ये कौटुंबिक सलोखा राखण्याचे कार्य संस्थेकडून सुरु आहे. विनाशुल्क हे काम सुरु असून, हजारो कुटुंबे विभक्त होण्यापासून वाचविण्याचे श्रेय संस्थेला आहे. सामाजिक समस्येबरोबरच महिलांच्या आरोग्यविषयक समस्या, कायद्याची माहिती तसेच विधी साक्षरता शिबिराचे आयोजन संस्थेतर्फे वेळोवेळी करण्यात येत आहे. समस्याग्रस्त व्यक्तींना स्वत:च्या पायावर आत्मविश्वासाने पुन्हा उभे करण्यासाठी संस्था कार्यरत राहिली आहे. महिला बचत गटासारखी संकल्पना फक्त पैशाची बचत करण्याकरिता मर्यादित न ठेवता सामाजिक संस्थांच्या मदतीने इच्छुक महिलांना व्यवसाय करण्यासाठी बिनव्याजी अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्याचा संस्थेने नवा आदर्श घालून दिला आहे. महिला सक्षमीकरण कागदोपत्री न करता प्रत्यक्षात महिला सबलीकरणासाठी संस्थेकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
बालकांचा केवळ विकास न करता त्यांचे संरक्षण करणेदेखील तितकेच गरजेचे आहे. याच दृष्टीकोनातून केंद्रीय महिला बालविकास, नवी दिल्ली, भारत सरकार यांच्या एकात्मिक बालसंरक्षण कार्यक्रमांतर्गत ५ मे २०११ पासून ‘चाईल्ड लाईन’ ही राष्ट्रीयस्तरावरील काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या मुलांसाठी आणि विधी संघर्षग्रस्त बालकांसाठी २४ तास मदत करणारी हेल्पलाईन जिल्ह्यासाठी सुरु करण्यात आली आहे. हेल्पलाईनच्या माध्यमातून बाल कामगार, भरकटलेली मुले, भीक मागणारी मुले, रस्त्यावर राहणारी मुले, कौटुंबिक कलहात सापडलेली मुले, शारीरिक व लैंगिक अत्याचारास बळी पडलेली मुले यांची योग्य ती निकड ओळखून मदत करण्याचे आणि त्यांचे पुनर्वसन योग्य ठिकाणी करण्याचे काम हेल्पलाईनच्या माध्यमातून सुरु आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बालकामगार समितीची स्थापना करण्यात आली आहे. शेकडो बालकांच्या समस्या या माध्यमातून सोडविण्यात येऊन त्यांचे पुनर्वसन करण्यात आले आहे.
संस्थेला मिळालेले पुरस्कार
सावित्रीबाई फुले पुरस्कार (२००५-०६).
अहिल्यादेवी होळकर पुरस्कार (२००९-१०).
साने गुरूजी गुणवत्ता विकास अभियानांतर्गत (२००६ पासून सलग तीन वर्षे) विशेष पुरस्कार.
अमेरिकन कौन्सिलिस्ट, मुंबईतर्फे आयोजित अमेरिका शिक्षण दौऱ्यात संस्थेच्या संस्थापिका सईदा नाईक यांची निवड.
बदलत्या शैक्षणिक धोरणानुसार नवनवीन शैक्षणिक बाबींचा समावेश आणि समाजाच्या सामाजिक समस्या ओळखून एम. एस. नाईक फाऊंडेशनची वाटचाल सुरू आहे. फाऊंडेशनच्या शैक्षणिक संकुलातंर्गत दोन हजारापेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विनाअनुदानित तत्वावर संस्था चालवत असताना विविध समस्यांना समोरे जावे लागते. मात्र, सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांची गरज ओळखून केजी ते बारावीपर्यंतचे शिक्षण एका छत्राखाली देण्याची व्यवस्था सुरू केली आहे. एवढंच नव्हे तर आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी कालशेकर ट्रस्टतर्फे अशा विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्यात येत आहे. शेकडो विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे.
- महंमद सिद्दीक नाईक, संस्थाध्यक्ष, एम. एस. नाईक फाऊंडेशन, रत्नागिरी.