संगीत हेच आमच्यासाठी जीवन...
By Admin | Updated: November 10, 2014 23:55 IST2014-11-10T23:14:08+5:302014-11-10T23:55:30+5:30
चंद्रकांत निमकर : संमेलनामधून संगीत रंगभूमीचा विकास शक्य होईल--संवाद

संगीत हेच आमच्यासाठी जीवन...
कलाकारांना चांगली संधी मिळेल
बेळगाव येथे यंदाचे मराठी नाट्यसंमेलन होत आहे. यानिमित्ताने संगीत रंगभूमी गाजवणाऱ्या कलावंताला प्रथमच अध्यक्षपदाचा मान मिळाला आहे. फय्याज यांच्या रुपाने या क्षेत्रात वावरणाऱ्या कलाकारांना यानिमित्ताने चांगली संधी मिळू शकते. कोकण हा संगीत रंगभूमी जिवंत ठेवणाऱ्यांचा परिसर आहे. याच भागातून अनेक दिग्गज कलावंत निर्माण झाले. मराठी रंगभूमी एका विशिष्ट वळणावर असतानाच या क्षेत्राशी अनेक संकटे येऊनही रंगभूमीचा संसार जपणारे चंद्रकांत निमकर यांचा या क्षेत्रातला प्रवास उल्लेखनीय आहे. अशा संमेलनातून संगीत रंगभूमी अधिक विकसीत व्हावी, अशी अपेक्षा यानिमित्ताने ते धरतात.
गेली तीस वर्षे स्वत: गायक व इतरांना या क्षेत्राचे बाळकडू पाजून अनेक कलाकार तयार केले. मात्र, ते शापीत गंधर्व ठरले. घरची परिस्थिती नसताना किंबहुना संगीताला आवश्यक असा परिपोष घराण्यात चालत आलेला नसताना त्यांनी ख्याल लिलया पेश केला. अनेक पातळ्यांवर संघर्ष करताना त्यांनी कधीही तडजोड केली नाही. आजही ते स्वत: रियाज करीत नव्या पिढीला मार्गदर्शन करीत आहेत. कोणता संगीत वर्ग नाही अथवा कोणतीही अपेक्षा नाही. मात्र, तरीही आपले जीवन हेच संगीत क्षेत्रासाठी आहे, असे ते मानतात.
चिपळूण, मुरादपूर येथील चंद्रकांत निमकर यांनी या भागात सादर केल्या जाणाऱ्या संगीत नाटकांमध्ये भूमिका केल्याच. मात्र, आपल्या समवेत चिपळूणमध्ये गायकांची एक फळी तयार केली. पूर्वी उत्सवात नाटक सादर केले जायचे. त्यावेळी संगीत नाटक असले की, प्रमुख भूमिका कोणी करायची असा प्रश्न असायचा. मात्र, याचे उत्तर निमकरांनी स्वत: दिले. अण्णासाहेब किर्लोस्कर यांचे संगीत सौभद्र, गोविंद बल्लाळ देवल यांचे संशयकल्लोळ, मानापमान, मृच्छ कटीक, संत गोरा कुंभार, जय जय गौरी शंकर अशा नाटकांमध्ये निमकर यांनी स्वत: भूमिका केली. याविषयी ते म्हणतात, संगीत सादर करणे व ते भूमिकेशी समरस होऊन रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याची कला हा यातील महत्त्वाचा भाग. आपल्याला जमेल तसे प्रयोग सादर करणे व त्यातून पुढील पिढीपर्यंत या गाजलेल्या नाट्यकृती पोहोचविण्याचे काम करायला मिळणे, हा आनंदाचा क्षण आहे.
ग्रामीण भागात जाताना तेथे साथसंगतीचा प्रश्न कायम उभा राहतो. गाणारा असेल तर हार्मोनियम अथवा तबला या दोन्ही गोष्टींशी कधीकधी तडजोड करावी लागायची. मग त्यावेळी नाटक सादर करणं, हा महत्त्वाचा भाग ठेवून आम्ही ते प्रयोग केले व रसिकांनी ते स्वीकारले. आज या क्षेत्रातील साधने अत्याधुनिक ढंग घेऊन समोर आली आहेत. त्याच्याशी स्पर्धा करणे शक्य नसले तरी गुरुंनी शिकविलेला ठेका व जीवनातील लय सांभाळताना आम्ही स्वत:मध्ये प्रगती करीत आहोत.
१९८७ला चिपळूणमध्ये गणेशोत्सवामध्ये अनेक ठिकाणी घरगुती गाण्याचे कार्यक्रम होत होते. त्यामध्ये भाग घेताना निश्चित आनंद व्हायचा. चांगले ऐकायला मिळायचे व त्यातूनच आपल्यामधील कमतरता आम्ही दूर करीत गेलो. त्याचा फायदा वयाच्या पन्नाशीनंतर शास्त्रीय संगीत ज्याखेरीज पूर्ण होऊ शकत नाही,असा ख्याल हा महत्त्वाचा प्रकार मला शिकता आला. एकेक तास मैफील सजविणे याचा अनुभव आम्ही कित्येक कार्यक्रमात घेतला. खरंतर अशा अनेक अनुभवांमधूनच आम्हाला संगीत रंगभूमी म्हणजे काय? हे उमजले. यानिमित्ताने नाट्य संमेलनाच्या कार्यक्रमानिमित्त या भागातील असे नाट्यप्रयोग सादर करता येतील.
नाटक करणे अवघड आहे. यासाठी येणारा खर्च व आवश्यक ते मनुष्यबळ मिळत नसल्याची ओरड आज होते आहे. अनेक ठिकाणी शासन कलाकारांपर्यंत पोहोचत नाही. संगीताशी संबंधित असे शिक्षण शाळांमधून सर्रास दिले जात नाही. याचा फटका हे क्षेत्र व्यापक न होण्यात झाला आहे. त्यासाठी अशा संमेलनामधून संगीतविषयक व नाट्यक्षेत्र अधिक व्यापक व्हावे, यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजेत. आपण स्वत: याबाबतीत संमेलन अध्यक्षांची भेट घेणार आहोत.
कोकणात धार्मिक स्थळांची रेलचेल आहे. प्रत्येक मंदिरात उत्सव होत असतो. स्थानिक पातळीवर आता नव्या प्रथा रुढ होत आहेत. त्यामुळे या उत्सवालाही शॉर्टकटची झळ बसत आहे. अनेक मंदिरात गाणे, पुराण, कीर्तन, तमाशा, दशावतार असे कार्यक्रम होत असत. आता या कार्यक्रमांना कात्री लागल्याने अनेक हौशी गायकांना आपल्या हौसेला मुरड घालावी लागते. त्याचा परिणाम आवाज व सादरीकरणामध्ये होत असतो. खरंतर कसलेला गायक अथवा नाणावलेला नट या दोघांमध्ये परिश्रम ही आवश्यक व अपरिहार्य अशी बाजू. प्रत्येकानेच ती सांभाळली पाहिजे. गायक, नट अथवा कलाकार या सर्व पायऱ्यांमध्ये परिश्रम घेण्याची तयारी करण्याची गरज आहे. यानिमित्त अशा क्षेत्राला पुढे आणण्यासाठी अखिल भारतीय स्तरावर प्रयत्न झाला तर त्यातून फायदाच होईल.
संगीत नाटक रंगभूमीवर आणणे हे महाकठीण. मात्र, जिल्ह्यातील विशेष संस्थांनी याला वेगळा दर्जा मिळवून दिला आहे. रत्नागिरी, चिपळूण, दापोली, केळशी, राजापूर, देवरुख अशा गावांमध्ये आजही संगीत नाटके होताना पाहायला मिळत आहेत. पुढील पिढीचा गाण्याकडे कल पुन्हा वाढत चाललेला पाहायला मिळतो आहे. आमच्या पिढीला संघर्ष करावा लागला. आताची पिढी उपलब्ध साधनांमध्ये स्वत:ची प्रगती करु शकते आहे. गाण्याचा कार्यक्रम करताना अथवा एखाद्या संगीत नाटकामध्ये भूमिका वठवताना अनेक स्तरांवर पाठिंबा मिळतो आहे. आमच्यासाठी त्या काळात अशक्य असलेली बाब काळानुरुप शक्य झाली आहे. हे परिवर्तन निश्चितच आशावादी असल्याचे निमकर म्हणतात.
- धनंजय काळे