ओवळीतील वादळग्रस्तांच्या मदतीला धावले मुंबईकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:23 IST2021-06-01T04:23:44+5:302021-06-01T04:23:44+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : तालुक्यातील ओवळी येथील कातवडी वस्तीला तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसला होता. वाऱ्याच्या जोराने घरावरील पत्रे ...

ओवळीतील वादळग्रस्तांच्या मदतीला धावले मुंबईकर
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : तालुक्यातील ओवळी येथील कातवडी वस्तीला तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसला होता. वाऱ्याच्या जोराने घरावरील पत्रे उडून गेले होते. पावसाळा तोंडावर आला तरी परिस्थितीअभावी त्यांना घरावर पत्रे टाकता आले नाहीत. याची दखल घेत मुंबईतील राजा शिवाजी विद्यालयातील १९८३च्या दहावी बॅचमधील विद्यार्थी कातकरी लोकांच्या मदतीला धावले आहेत. त्यांनी प्रथम नुकसानग्रस्तांच्या घरांची पाहणी करत आवश्यक असलेले पत्रे, लोखंडी पाईप व आवश्यक ते सर्व साहित्य मोफत दिले आहे.
मुंबई दादर येथील आई. ई. एस. गर्ल्स स्कूल राजा शिवाजी विद्यालयाचे १९८३ बॅचचे विद्यार्थी सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून संघटित झाले आहेत. दोन वर्षांपूर्वी सांगली, कोल्हापूर येथे आलेल्या महापुरातही या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी वर्गणी काढून लाखोंची मदत केली होती. या माजी विद्यार्थ्यांमध्ये कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई तसेच विविध ठिकाणच्या लोकांचा समावेश आहे. तालुक्यातील ओवळी तसेच कोळकेवाडी धनगरवाडी येथे तौक्ते चक्रीवादळात सामान्य व गरजू कुटुंबांना फटका बसल्याची माहिती राजा शिवाजी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी ओवळी येथील नंदा निकम, रामचंद्र निकम, संजय पवार, गीता पवार, शेवंती पवार, विष्णू निकम या कातकरी वाडीतील लोकांच्या नुकसानाची पाहणी केली. ग्रुपचे जितेंद्र खानविलकर, सचिन शिंदे, किरण शिंदे, राजेश चाळके, संजय जगदाळे, विजय शिगवण यांनी कातकरी वस्तीमधील नुकसान झालेल्या घरांची पाहणी करत आवश्यक वस्तूंंची यादी केली. त्यानुसार छत दुरूस्तीसाठी लागणारे, पत्रे, लोखंडी पाईप, खिळे आदी सर्व साहित्य एका ट्रकमध्ये घेऊन ते ओवळीत पोहोच केले.
यासाठी माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतल्याने कातकरी बांधवांनी समाधानाची भावना व्यक्त केली. या मदतकार्यात ग्रुपचे अध्यक्ष माधवी गवाणकर, मनोज मुळ्ये, डॉ. अश्विन सावंत, अमोघ मथुरे यांनी मेहनत घेतली. हे साहित्य देताना ओवळीच्या सरपंच शेवंती पवार, उपसरपंच दिनेश शिंदे, सदस्य केशव कदम, निकीता शिंदे, संपदा बोलाडे, माधवी शिंदे, दीपिका शिंदे, ग्रामविकास अधिकारी मंगेश पिंगळे यांच्यासह ग्रुपचे सदस्य व नुकसानग्रस्त कातकरी बांधव उपस्थित होते.