रत्नागिरी : टँकरमध्ये स्फोटके असल्याबाबत खोडसाळपणे फोन करणाऱ्या संशयिताला मुंबईपोलिसांनी घाटकोपर येथून अटक केली आहे. नीलेश पांडे (४३, रा. घाटकोपर मुंबई) असे त्याचे नाव आहे. पांडे याच्या दुचाकीला टँकर चालकाने ठाणे येथे धडक दिली होती. याच रागातून दारूच्या नशेत त्याने हे कृत्य केल्याची कबुली त्याने पोलिसांकडे दिली आहे.मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला रविवारी (२३ जुलै) पहाटे स्फाेटकाने भरलेला पांढरा टँकर गुजरातहून गोव्याला जात असल्याचा फोन आला. या टँकरमध्ये दोन पाकिस्तानी नागरिकही असल्याचे त्याने सांगितले. तातडीने ही माहिती महाराष्ट्र पोलिसांना देण्यात आली. त्यांनी गुजरात ते गोवा सर्व मार्गावर नाकेबंदी करून टँकरची तपासणी सुरू केली. रत्नागिरी पाेलिसांनी तात्काळ सूत्र हलवून नाकाबंदी केली. संगमेश्वर तालुक्यातील वांद्री येथील तपासणी नाक्यावर माहिती दिलेल्या क्रमांकाचा टँकर पोहोचला असता त्याची तपासणी करण्यात आली. त्यात पॉलिथिन बनवण्याचा कच्चा माल असल्याचे पोलिसांना आढळले.पोलिसांनी चालकाकडील कागदपत्रांचीही कसून तपासणी केली. मात्र, त्यात काहीही संशयास्पद आढळले नाही. त्यानंतर मुंबई पोलिसांनी फाेन करणाऱ्याचा शोध घेतला असता तो घाटकोपरचा रहिवासी असल्याचे पुढे आले. त्याला ताब्यात घेतले असतात त्याने हा फोन खोडसाळपणे व दारूच्या नशेत केल्याचे सांगितले. पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून खोटी माहिती दिल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हा शाखेने नीलेश पांडे याला ताब्यात घेतले आहे.
टॅंकरमध्ये स्फोटक असल्याचा फोन, मुंबई पोलिसांनी संशयिताला घाटकोपर येथून केली अटक; अन् समोर आलं..
By अरुण आडिवरेकर | Updated: July 25, 2023 17:28 IST