माभळेत मुंबईतील महिलेचा खून, बेपत्ताच्या तक्रारीची इतिश्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 15:31 IST2018-07-31T15:28:11+5:302018-07-31T15:31:42+5:30
संगमेश्वर तालुक्यातील माभळे सडा येथील चिरेखाणीत मुंबई येथील एका महिलेला ढकलून खून केल्याची खळबळजनक घटना सोमवारी उघडकीस आली आहे. याप्रकरणी माभळे येथील श्रीकांत घडशी याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

माभळेत मुंबईतील महिलेचा खून, बेपत्ताच्या तक्रारीची इतिश्री
देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील माभळे सडा येथील चिरेखाणीत मुंबई येथील एका महिलेला ढकलून खून केल्याची खळबळजनक घटना सोमवारी उघडकीस आली आहे. याप्रकरणी माभळे येथील श्रीकांत घडशी याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
स्मिता चंद्र्रशेखर कुसुरकर (४५, लोअर परेल, मुंबई) असे खूनझालेल्या महिलेचे नाव आहे. स्मिता या १२ जुलै रोजी रेल्वेतून रात्री आरवली येथे उतरल्या. आरवली येथून श्रीकांतने स्वत:च्या टाटा सुमोमधून त्यांना जमीन दाखवण्यासाठी नेले.
यावेळीच माभळे सडा येथील चिरेखाणीत कुसुरकर यांना ढकलून दिल्याची कबुली श्रीकांतने पोलिसांसमोर दिल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. श्रीकांत याची उलटसुलट चौकशी केल्यानंतर स्मिता यांचा खून कोणत्या कारणासाठी करण्यात आला, हे स्पष्ट होणार आहे. चिरेखाणीचा व्यवसाय करण्यासाठी घेण्यात येणाऱ्या या व्यवहाराकरिता कुसुरकर यांनी पैसे दिले होते का? हेदेखील उघड होणार आहे.
स्मिता या ११ जुलै रोजी सकाळी ७.४५ वाजण्याच्या सुमारास जमिनीच्या कामासाठी कोकणात जाते, असे घरच्या मंडळींना सांगून घराबाहेर पडल्या होत्या. बरेच दिवस झाले तरी त्या घरी आल्या नाहीत आणि मोबाईलही बंद स्वीच आॅफ येत असल्याने त्यांचे पती चंदशेखर यांनी पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार १६ जुलै रोजी मुंबईतील ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात दिली.
कुसुरकर यांच्या तक्रारीत कोकणचा उल्लेख आल्याने ही तक्रार रत्नागिरी पोलिसांकडे वर्ग करण्यात आली. हा तपास स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेकडे सोपविण्यात आला होता. गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक शिरीष सासने व त्यांच्या सहकाऱ्यांनी याप्रकरणी विशेष लक्ष देत तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
संभाषणावरून सुगावा
स्मिता यांच्या भ्रमणध्वनीवर संभाषण झालेल्यांचे नंबर तपासण्यात आले. यामध्ये संगमेश्वर तालुक्यातील माभळे गावातील श्रीकांत घडशी व स्मिता कुसुरकर यांचे शेवटचे संभाषण झाल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी श्रीकांतला गाठण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो फरार असल्याचे समजले.
खुनाचा गुन्हा दाखल
मुंबई येथे सापळा रचून रविवारी मोठ्या कौशल्याने श्रीकांतला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. अखेर वर्दीपुढे श्रीकांतने स्मिता यांचा खून केल्याची कबुली दिली. स्मिता यांना चिरेखाणीत ढकलून मारल्याचे सांगितले. त्याच्यावर भारतीय दंड विधान कलम ३०२, २०१ अन्वये गुन्हा दाखल झाला.