काेविडच्या पार्श्वभूमीवर निरामय हाॅस्पिटल सुरू करण्याच्या हालचाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:23 IST2021-06-01T04:23:22+5:302021-06-01T04:23:22+5:30
गुहागर : काेराेनाच्या काळात आराेग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्याकडे राज्य शासनाने विशेष लक्ष दिले आहे. रुग्णांना चांगली सेवा ...

काेविडच्या पार्श्वभूमीवर निरामय हाॅस्पिटल सुरू करण्याच्या हालचाली
गुहागर : काेराेनाच्या काळात आराेग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्याकडे राज्य शासनाने विशेष लक्ष दिले आहे. रुग्णांना चांगली सेवा मिळण्यासाठी जास्तीत जास्त काेविड सेंटर उभारून बेड्स वाढविण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याच अनुषंगाने गुहागर तालुक्यातील बंद असलेल्या निरामय हाॅस्पिटलची उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शनिवारी पाहणी केली. या पाहणीनंतर हे हाॅस्पिटल सुरू करण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे संकेत दिले.
गुहागर तालुक्यात एन्रॉन प्रकल्प आल्यानंतर वैद्यकीय सुविधा देण्याच्या दृष्टीने निरामय हाॅस्पिटलची उभारणी करण्यात आली होती. या रुग्णालयामुळे गुहागरातील नागरिकांना चांगली आराेग्य सुविधा मिळत होती. त्यानंतर एन्राॅन बंद झाले आणि या हाॅस्पिटललाही टाळे लागले. त्यामुळे सुसज्ज असणारे हाॅस्पिटल पुन्हा सुरू हाेण्याच्या हालचाली सुरू झाल्या. मात्र, त्याला फारसे यश आले नाही. सध्या काेराेनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन प्रत्येक तालुक्यात सुसज्ज हाॅस्पिटल उभारण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर बंद असलेले निरामय रुग्णालय सुरू करता येईल का? याची चाचपणी करण्यासाठी मंत्री उदय सामंत व खासदार विनायक राऊत यांनी शनिवारी भेट देऊन पाहणी केली. या रुग्णालयाची इमारत सुस्थितीत असून, हे रुग्णालय सुरू करण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक असल्याचे संकेत दिले. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार लता धाेत्रे, शशिकांत चव्हाण व सर्व खात्यांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी रुग्णालयाचे सर्व विभाग उघडून पाहणी करताना इमारत सुस्थितीत असल्याची प्रतिक्रिया दिली. त्यानंतर आरजीपीपीएलमध्ये सावित्री भवन येथे गुहागर तालुक्याचा कोविडचा आढावा घेऊन निरामय रुग्णालयासंदर्भात चर्चा केली.
यावेळी उदय सामंत यांनी सांगितले की, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार निरामय रुग्णालयाची पाहणी केल्याचे स्पष्ट केले. हे रुग्णालय बंद होऊन वीस वर्षे झाली असली तरी आजही इमारत सुस्थितीत आहे. इमारत शासनाच्या ताब्यात कशी घेता येईल आणि ती कशी सुरू करता येईल, यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे मंत्री सामंत म्हणाले. सध्याची वाढती कोविड रुग्ण संख्या लक्षात घेऊन जिल्हा आरोग्य यंत्रणेवर ताण येत आहे, अशीच स्थिती राहिल्यास रुग्णांना तालुका पातळीवर चांगली आरोग्य सुविधा देण्यासाठी निरामयसारखे रुग्णालय सुरू होणे अधिक सोयीचे व गरजेचे असल्याचे सांगितले.
-------------------------------
गुहागर तालुक्यातील निरायम हाॅस्पिटलची उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार लता धाेत्रे उपस्थित हाेते.