डोंगरची काळी मैना अस्तित्व दाखवतेय!
By Admin | Updated: April 7, 2015 01:29 IST2015-04-06T23:00:59+5:302015-04-07T01:29:45+5:30
संवर्धन करा : वृक्षतोडीचा फटका करवंदाच्या जाळींनाही बसतोय...

डोंगरची काळी मैना अस्तित्व दाखवतेय!
जाकादेवी : जाकादेवी परिसरातील डोंगराळ भागात डोंगरची काळी मैना करवंदीच्या झुडपांवर अस्तित्व दाखवू लागली आहे. काही दिवसातच ही डोंगरची काळी मैना रानमेवा म्हणून खवय्यांना उपलब्ध होईल.वेगवेगळ्या कारणानी लोकांनी केलेली वृक्षतोड त्याचबरोबर झुडुपांच्या तोडीत करवंदीचे प्रमाण जंगलातून कमी होताना दिसते आहे. करवंदीच्या काट्यांमुळे ती नकोशी होत असतानाच शेताला, बागेला कुंपण करण्यासाठी त्याचा जो वापर आजही होतोय त्यामुळे करवंंदीचे प्रमाण झपाट्याने कमी होताना दिसते आहे. वनस्पतीच्या तोडीने करवंदांचे प्रमाण झपाट्याने कमी होत असल्याने पुढे बिकट परिस्थिती उद्भवू शकते.
करवंद एप्रिल आणि मे महिन्यात मुबलक प्रमाणात उपलब्ध होत असतात. आंबट - मधूर गोड लागणारी करवंद आलेल्या हंगामात सेवन करणे प्रकृतीच्या दृष्टीने लाभदायक असते. पिकलेली करवंद खाल्ली जातात. त्याचबरोबर करवंदाचे सरबतही केले जाते. करवंदे पिकली की ती सुकवून त्याचा बेदाण्यासारखा उपयोग केला जातो. पिक्की करवंदे बिया काढून त्यांना मीठ लावून सुकवून ठेवली जातात व खाल्ली जातात. कच्च्या करवंदांचे अलिकडच्या काळात लोणचे मोठ्या प्रमाणात केले जाते. झाडाला आलेली करवंद शिजवून ती वस्त्रगाळ करुन काढलेल्या रसात इसेन्स टाकून सरबत केले जाते किंवा सरबत करण्यासाठी रस बाटलीत भरुन ठेवला जातो.कमी होत चाललेला हा करवंद रानमेवा टिकवण्याची सर्वांची जबाबदारी आहे. (वार्ताहर)
जाकादेवी परिसरात करवंद मुबलक प्रमाणात विक्रीला येण्यास काही दिवसांचा अवधी आहे. मात्र, ग्रामीण परिसरात करवंदांच्या जाळीकडे व्यावसायिकांचे लक्ष लागलेय. हंगामी उत्पन्न देणारी ही काळी मैना आहे.
कातळ साफ करण्याच्या नादात निसर्गदत्त संपत्तीकडे कानाडोळा होतोय. वृक्षतोडीचा फटका या वनस्पतीलाही बसतोय.
करवंदाचा उपयोग आता वाईनसाठीही होऊ लागल्याने त्याचे महत्व वाढलेय.
विविध उपयोगी करवंद राखायला हवे.
कोकणात पर्यटक समुद्र सफर करण्यासाठी येत असले तरी आता ग्रामीण पर्यटनाचा ओढाही वाढू लागला आहे. गावोगाव त्या भागातील भौगोलिक स्थितीचा आढावा घेतला गेला तेव्हा करवंदांच्या झाडीची तोड मोठ्या प्रमाणावर होत असताना पाहायला मिळतेय. कोकणची ही निसर्गसंपदा टिकविण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला तर त्याला महत्व प्राप्त होणार आहे.