चिपळूण : गेल्या काही दिवसात शहरात डासांचे प्रमाण वाढले असून, कोरोनाचा प्रादुर्भावही वाढत आहे. त्यासाठी नगर परिषदेने सॅनिटायझेशनसह डास प्रतिबंधक फवारणी मोहीम सुरू केली आहे. शहरातील विविध भागांत पाच गाड्यांच्या माध्यमातून ही फवारणी केली जात आहे.
ताैक्ते वादळादरम्यान झालेल्या पावसानंतर अचानक शहरात डासांचे प्रमाण वाढले आहे. शहरातील प्रत्येक प्रभागातील नागरिक वाढत्या डासांमुळे हैराण झाले आहेत. याविषयी नागरिकांमधून ओरड सुरु झाल्याने नगर परिषदेने तत्काळ डास प्रतिबंधक फवारणी सुरु केली आहे. त्यासाठी ठेकेदारी पध्दतीने खास फवारणीसाठी पाच गाड्या भाड्याने घेऊन ही फवारणी सुरु केली आहे. सुमारे एक महिना ही मोहीम सुरू राहणार आहे.
सध्या शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. शहरातील मार्कंडी भाग हॉटस्पॉट म्हणून जाहीर केला आहे. त्या अनुषंगाने ही फवारणी केली जात आहे. त्यासाठी नगर परिषदेने विशिष्ट प्रकारचे लिक्विड मागवले आहे. त्यामुळे या फवारणीचा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सॅनिटायझेशन व डास प्रतिबंधक असा दुहेरी उपयोग होणार असल्याचे आरोग्य विभागप्रमुख वैभव निवाते यांनी सांगितले.
---------------------
चिपळूण शहरातील नागरिकांच्या मागणीनुसार ही फवारणी सुरु केली आहे. महिनाभर ही मोहीम सुरु राहणार असल्याने प्रत्येक प्रभागातील नागरिकांनी त्याचा फायदा घ्यावा. त्यासाठी स्थानिक नगरसेवक व नगर परिषद कर्मचारी वैभव निवाते यांच्याशी संपर्क साधावा.
- शशिकांत मोदी, आरोग्य समिती सभापती, चिपळूण.