निःशब्द... काही व्यापारी रडले, काहींनी शटरच नाही उघडले; महापुरात तब्बल ५०० कोटींचं नुकसान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 13:42 IST2021-07-26T04:28:33+5:302021-07-26T13:42:16+5:30
चिपळूण : आस्मानी संकट बनून आलेल्या महापुराने चिपळूणमध्ये दोन दिवस अक्षरशः थैमान घातले. त्यात संपूर्ण बाजारपेठ व लगतचा गजबजलेला ...

निःशब्द... काही व्यापारी रडले, काहींनी शटरच नाही उघडले; महापुरात तब्बल ५०० कोटींचं नुकसान!
चिपळूण : आस्मानी संकट बनून आलेल्या महापुराने चिपळूणमध्ये दोन दिवस अक्षरशः थैमान घातले. त्यात संपूर्ण बाजारपेठ व लगतचा गजबजलेला परिसर उद्ध्वस्त झाला आहे. शहरातील सुमारे ३ हजार, तर खेर्डीतील १२०० व्यापाऱ्यांना फटका बसला असून, सुमारे ५०० कोटीहून अधिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
येथील बाजारपेठेत बुधवारी रात्री ८ वाजल्यापासून पाणी शिरू लागले होते. मात्र, तरीही सर्वच व्यापारी बेसावध राहिले. जेव्हा दुकानात पाणी शिरले तेव्हा दुकानातील माल सुरक्षितस्थळी हटवण्यासाठी हाताशी कामगार व अन्य कोणी नव्हते. अशा वेळी नेहमीची पूररेषा लक्षात घेत त्या उंचीवर काहींनी माल रचून ठेवला, तर काहींनी एवढं पाणी वाढणार नाही, असा समज करत त्याकडे दुर्लक्ष केले. परंतु, २६ जुलै २००५मधील महापुराची पातळी महापुराने ओलांडल्यानंतर अनेक व्यापाऱ्यांनी मालाच्या सुरक्षिततेची आशाच सोडून दिली. त्याचे खरे रौद्ररुप शनिवारी सकाळी प्रत्यक्षात पहिल्यानंतर व्यापारी अक्षरशः खचून गेले. अशावेळी दुकान उघण्याचेही अनेकांना धाडस झाले नाही. काहींनी दुकान उघडले, परंतु परिस्थिती पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले.
अनेकांच्या दुकानात किमान एका फूट इतका गाळ साचला असून, तितकाच गाळ मालावर आहे. अगदी कापड, किराणा, बेकरी, हॉटेल, घरगुती वस्तू, फर्निचर, ज्वेलर्स, हेअर कटिंग, धूप - अगरबत्ती, पूजेचे साहित्य, प्लास्टिक वस्तूंची विक्री करणाऱ्या दुकानात व मॉलमध्येही अतोनात नुकसान झाले आहे. त्याशिवाय प्रिंटिंग मशीन, स्टेशनरी, झेरॉक्स सेंटर, कॉम्प्युटर, टीव्ही, इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिक वस्तूंचेही अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे बहुतांश दुकानांसमोर निकामी झालेल्या वस्तू व साहित्याचे ढीग लागले आहेत. याशिवाय काही दुकानांचे शटर उखडले असून, बांधकामाचीही हानी झाली आहे.
चिपळूण शहराच्या इतिहासात प्रथमच व्यापाऱ्यांची इतकी मोठी हानी झाली आहे. शासकीय यंत्रणेने सतर्कता न बाळगल्याने बाजारपेठेतील व्यापारी या पूरपरिस्थितीबाबत अनभिज्ञ राहिला. इतके नुकसान याआधी कधीही झाले नाही व या महापुरातही झाले नसते. त्यामुळे या व्यापाऱ्यांना नुकसान भरपाई देताना तितकी गांभीर्यता लक्षात घ्यायला हवी. आधीच कोरोनाच्या परिस्थितीमुळे व्यापारी हतबल झाला आहे. त्यात आता महापुरामुळे चिपळूणचा व्यापार संपुष्टात आला आहे.
- शिरीष काटकर, अध्यक्ष, चिपळूण व्यापारी संघ.