Ratnagiri: दाभोळ खाडीत पर्यटनप्रेमीचे जीवदीप्तीचे निरीक्षण सुरू, समुद्रातील निळ्या लाटांच्या कुतुहलाचा होणार अभ्यास

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2024 05:57 PM2024-02-03T17:57:12+5:302024-02-03T17:57:32+5:30

मंदार गोयथळे शृंगारतळी : गोव्यातील समुद्रात सर्रास निरीक्षण केले जाणाऱ्या जीवदीप्तीचे निरीक्षण जवळजवळ वर्षभरानंतर पुन्हा एकदा सलग दुसऱ्या वर्षी ...

Monitoring of life in Dabhol Bay started, The curiosity of blue waves in the sea will be studied | Ratnagiri: दाभोळ खाडीत पर्यटनप्रेमीचे जीवदीप्तीचे निरीक्षण सुरू, समुद्रातील निळ्या लाटांच्या कुतुहलाचा होणार अभ्यास

Ratnagiri: दाभोळ खाडीत पर्यटनप्रेमीचे जीवदीप्तीचे निरीक्षण सुरू, समुद्रातील निळ्या लाटांच्या कुतुहलाचा होणार अभ्यास

मंदार गोयथळे

शृंगारतळी : गोव्यातील समुद्रात सर्रास निरीक्षण केले जाणाऱ्या जीवदीप्तीचे निरीक्षण जवळजवळ वर्षभरानंतर पुन्हा एकदा सलग दुसऱ्या वर्षी कोकणातील दाभोळ खाडीत करण्यात आले. हे निरीक्षण परचुरी येथील पर्यटन व्यावसायिक व पर्यटनप्रेमी सत्यवान देर्देकर यांनी केले आहे.

गुहागर तालुक्यातील परचुरी येथे सत्यवान देर्देकर हे गेली अनेक वर्षे पर्यटन व्यवसाय करतात. दाभोळ खाडीत केल्या जाणाऱ्या मगर सफरसाठी ते विशेष प्रसिद्ध आहेत. गोव्याच्या समुद्रामध्ये जीवदीप्तीचे निरीक्षण केले जाते. कोकणात अशी जीवदीप्ती अनेक वेळा दिसते मात्र तिचे निरीक्षण होत नाही.

जीवदीप्तीमान सजीवांच्या पेशीत ल्युसिफेरीन वर्गातील रसायने आणि ल्युसिफरेज (विकर) ही रसायने तयार होतात. ल्युसिफेरीनचा ऑक्सिजनाशी संयोग घडून आल्यामुळे प्रकाशनिर्मिती होते. या क्रियेत ल्युसिफरेज विकर उत्प्रेरकाची भूमिका बजावते. काही वेळा कॅल्शियमची आयने किंवा एटीपीचे रेणू या क्रियेत भाग घेतात. वेगवेगळ्या सजीवांमध्ये आढळणारे ल्युसिफेरिन वेगवेगळे असते. त्यामुळे त्यांच्यापासून बाहेर पडणारा प्रकाश वेगवेगळ्या तरंगलांबीचा, निळसर ते लाल असतो. हा प्रकाश ‘शीत’ प्रकारचा असतो. या अभिक्रियेत मुक्त झालेली ८० टक्के ऊर्जा प्रकाशाच्या स्वरूपात बाहेर टाकली जाते तर उर्वरित सु. २० टक्के ऊर्जा उष्णतेच्या स्वरूपात बाहेर पडते.

फोटोबॅक्टेरियम फॉस्फोरियम जातीच्या जीवाणूंच्या वृद्धीमिश्रणातून उत्सर्जित झालेला प्रकाश काही मीटर दूर असलेली वस्तू झळाळून टाकते. अनेक सागरी प्राणी जसे आंतरदेहगुही, कृमी, मृदुकाय, कंटकचर्मी मासे आणि जीवाणूंमध्ये सहजीवन आढळून येते. हे जीवाणू जीवदीप्तीकारक असतात. त्याबाबतचा अभ्यासही यातून केला जाणार आहे.

जोडीदार शोधण्यासाठी..

सागरी वलयी प्राण्यांमध्ये मादी पाण्याच्या पृष्ठभागावर येते आणि प्रकाशमान होते. हा प्रकाश पाहून खोल पाण्यातील नर पृष्ठभागावर येऊन मादीबरोबर प्रणय करतो. नंतर दोघेही पाण्यात प्रजननपेशी सोडतात. काही जीवदीप्तीमान खेकडे मिलनासाठी जोडीदार शोधण्यासाठी जीवदीप्तीचा वापर करतात. त्या प्रकाशामुळे समुद्रातील लाटा निळसर दिसू लागतात. पर्यटकांसाठी हे मोठे आकर्षण असते.

दाभोळ खाडीत जीवदीप्ती अनेक वेळा दिसते. मात्र, मच्छिमार यांनी त्याचे कधी निरीक्षण केले नसावे. आमच्या नवीन बोटीचे काम सुरू असताना आर्किटेक्ट रोहन मेंगले यांना परचुरी बंदरावरून ही जीवदीप्ती दिसली. त्यांनी याबाबत माहिती दिल्यावर या जीवदीप्तीचे निरीक्षण गतवर्षी पहिल्यांदा केले होते. यावर्षी पुन्हा एकदा सलग दुसऱ्यांदा हे निरीक्षण आपण केले. - सत्यवान देर्देकर, पर्यटन व्यावसायिक, परचुरी.

Web Title: Monitoring of life in Dabhol Bay started, The curiosity of blue waves in the sea will be studied

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.