रत्नागिरी : वेळ दुपारी चारची. येथील तहसील कार्यालयात बॉम्ब पडल्याचा दूरध्वनी संदेश पोलिस, जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्ष यांना मिळाला. तहसीलदार कार्यालय इमारतीच्या पहिल्या मजल्यावर धुराचे लोट बाहेर पडत होते. धोक्याचा सायरन वाजला. याचवेळी या इमारतीसमोरही दोन बॉम्ब फुटले. आपत्कालीन परिस्थिती लक्षात येताच विविध यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना जवानांनी बाहेर काढत रुग्णवाहिकेमध्ये दाखल केले. अन्य कर्मचारी, अधिकारी, कामानिमित्त आलेले नागरिक यांनाही सुरक्षित स्थळी आणले.जखमींना उपचारासाठी घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकांचे सायरन परिसरात घुमत होते. यात वैद्यकीय पथक तैनात होते. जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. परिस्थिती नियंत्रणात असल्याची खात्री केली.ही घटना कुठल्या बाॅम्बस्फोटाची नव्हे, तर केंद्र शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाने केलेल्या ‘ऑपरेशन अभ्यास’ची रंगीत तालीम (माॅक ड्रिल)मधील हा प्रसंग होता. जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह आणि पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात कोणतीही अफवा न पसरता प्रशासनाने विविध यंत्रणांच्या साहाय्याने मॉक ड्रिल यशस्वी केले.या माॅक ड्रिलमध्ये निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, प्रांताधिकारी जीवन देसाई, तहसीलदार राजाराम म्हात्रे, पोलिस उपअधीक्षक नीलेश माईंनकर, शहर पोलिस निरीक्षक सतीश शिवरेकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आधिकारी अजय सूर्यवंशी तसेच प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी यांचा सहभाग होता.
केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार सर्व नियमांचे पालन करून मॉक ड्रिल यशस्वी करण्यात आले. या मॉक ड्रिलमध्ये गतीने नागरिकांना बाहेर काढून त्यांना सुरक्षित स्थळी हालविण्यात आले. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. देशावर ज्या ज्या वेळी संकट येते त्या त्या वेळी नागरिक आपली जबाबदारी पार पाडतात. आजच्या मॉक ड्रिलमध्ये कोणतीही अफवा न पसरता ते यशस्वी करण्यात आले. याचा अहवाल राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांना पाठविण्यात येणार आहे. - एम. देवेंदर सिंह, जिल्हाधिकारी, रत्नागिरी
अल्प कालावधीत आयोजित केलेल्या या मॉक ड्रिलला सर्वच विभागांनी मिळालेल्या काॅलला उत्तम प्रतिसाद दिला. या माॅक ड्रिलमध्ये काही त्रुटी असतील तर त्यामध्ये निश्चितपणे सुधारणा केली जाईल. - धनंजय कुलकर्णी, जिल्हा पोलिस अधीक्षक, रत्नागिरी