चिपळूण : गुहागर व चिपळूण तालुक्याच्या मान्सूनपूर्व आढावा बैठकीचे आमदार भास्कर जाधव यांना निमंत्रण न दिल्याने भर सभेत त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. या महत्त्वाच्या बैठकीला आपल्याला निमंत्रण का नाही, असे विचारत भास्कर जाधव यांनी अधिकाऱ्यांवर ताेंडसुख घेतले.पालकमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी येथील पंचायत समितीमध्ये गुहागर व चिपळूण तालुक्याची मान्सूनपूर्व आढावा बैठक घेतली. या सभेत जंगलातील वणवा आणि प्रोटोकॉलचा वणवा, असे दोन विषय चांगलेच पेटले. या सभेत आमदार भास्कर जाधव यांनी मला बोलवू नका, असे पालकमंत्र्यांनी सांगितले होते का, असा प्रश्न करत सभेचे निमंत्रण का दिले नाही, असे विचारले.
राजकारणात अधिकाऱ्यांनी पडू नये त्यावर पालकमंत्र्यांनी खुलासा करत सांगितले की, विनाकारण गैरसमज होतात. राजकारण हे वेगळे असते, त्यात अधिकाऱ्यांनी पडू नये. आपत्कालीन विषयासारख्या महत्त्वाच्या बैठकांना त्या त्या भागातील स्थानिक आमदारांना बोलवायला हवं, असे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले.
चौकशी करून गुन्हे दाखल कराकोकणामध्ये वणव्याची समस्या फार गंभीर आहे. हे वणवे नैसर्गिकरित्या लागतात की, जाणीवपूर्वक लावले जात आहेत, याची चौकशी करा. चौकशी करून आपत्कालीन कायदे लावून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले. चिपळूण व गुहागरमध्ये पावसाळ्यात पुराच्या पार्श्वभूमीवर, दरडी कोसळण्याच्या ठिकाणांवर लक्ष ठेवा, लोकांची कसल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, याची काळजी घ्या, असे त्यांनी सांगितले.या बैठकीला गुहागरचे आमदार भास्कर जाधव, प्रांताधिकारी आकाश लिगाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने, तहसीलदार प्रवीण लोकरे, मुख्याधिकारी विशाल भोसले, वन विभागाच्या गिरीजा देसाई, गुहागरचे तहसीलदार पाटील यांच्यासह गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी, वनअधिकारी व विविध खात्यांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.चार महिन्यात चांगले काम करा, चार महिन्यानंतर आढावा घेतला जाईल आणि अधिकाऱ्यांचे काम पाहून त्यांचा सत्कार केला जाईल, असेही पालकमंत्री सामंत यांनी सांगितले.