मंत्र्यांचे दौरे, मोर्चामुळे प्रशासनाची तारांबळ
By Admin | Updated: October 15, 2016 01:16 IST2016-10-15T01:16:33+5:302016-10-15T01:16:33+5:30
रत्नागिरी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, इतर मंत्रिगण, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचा दौरा

मंत्र्यांचे दौरे, मोर्चामुळे प्रशासनाची तारांबळ
रत्नागिरी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, इतर मंत्रिगण, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचा दौरा आणि त्याचवेळी मराठा मूक मोर्चा असे महत्त्वाचे उपक्रम सलग दोन दिवसांत होत असल्याने जिल्हा प्रशासन आणि पोलिसांची तारांबळ उडाली आहे.
उद्या, रविवारी चिपळूण येथे मराठा क्रांती मूक मोर्चा काढला जाणार आहे. त्याच्या नियोजनाची तयारी जिल्हा प्रशासनाकडून होत असतानाच आज, शनिवारी नाणीज येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे तसेच महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे याही असणार आहेत. त्यामुळे चिपळूणबरोबरच नाणीज येथील बंदोबस्ताची तयारी सुरू झाली आहे. या दौऱ्याच्या नियोजनाच्या अनुषंगाने वाहने तयार ठेवण्याच्या सूचना दोन दिवसांपूर्वीच जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या होत्या.
या दोन उपक्रमांची तयारी सुरू असतानाच रविवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचाही नाणीज येथे दौरा जाहीर झाला आहे. त्यांना अति विशेष सुरक्षा (झेड प्लस) आहे. त्यांच्यासोबत केंद्रीय सार्वजनिक बांधकाममंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर हेही उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि पोलिसांची तारेवरची कसरत सुरू झाली आहे.
आज, शनिवार आणि उद्या, रविवार रोजी होणाऱ्या या तीनही महत्त्वाच्या कार्यक्रमांच्या नियोजनाबाबत शुक्रवारी सायंकाळ उशिरापर्यंत जिल्हा प्रशासनातर्फे बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या. या बैठका घेताना जिल्हाधिकारी प्रदीप पी. आणि जिल्हा पोलिस अधीक्षक प्रणय अशोक नाणीज येथेही सुरक्षा व्यवस्था तपासत आहेत. (प्रतिनिधी)