गणपतीपुळे : विश्व मराठी साहित्य संमेलनात देण्यात येणाऱ्या ‘साहित्य भूषण’ पुरस्काराची रक्कम यावर्षीपासून १० लाख रुपये करण्यात येत आहे. तसेच मालगुंड येथील केशवसुतांच्या स्मारकाच्या नूतनीकरणासाठी १ कोटी रुपये दिले जातील, अशी घोषणा राज्याचे मराठी भाषा मंत्रीउदय सामंत यांनी रविवारी मालगुंड येथे केली.मालगुंड (ता. रत्नागिरी) येथील कवी केशवसुत स्मारक येथे ‘पुस्तकांचे गाव’ उपक्रमाचा लोकार्पण सोहळा आणि कोकण साहित्य सन्मान दालनाचे उद्घाटन रविवारी करण्यात आले. त्यावेळी मंत्री सामंत बोलत होते. अध्यक्षस्थानी कोमसापचे संस्थापक मधु मंगेश कर्णिक, ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर, कवी अरुण म्हात्रे, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मराठी भाषा संचालक डॉ. शामकांत देवरे, उपजिल्हाधिकारी तथा मराठी भाषा अधिकारी शुभांगी साठे, सरपंच श्वेता खेऊर, कवी केशवसुत स्मारक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन पाटील उपस्थित होते.
मंत्री सामंत पुढे म्हणाले की, कोकणाला साहित्यिकांची फार मोठी परंपरा लाभलेली आहे. कोकणाने राज्याला दिलेले साहित्यिक पाहता, कोकण साहित्याच्या दृष्टीने प्रगत आहे. हे साहित्य आपण सर्वांनी पोहाेचवले पाहिजे, असे ते म्हणाले.मधु मंगेश कर्णिक यांनी कवी केशवसुत मालगुंडला जन्माला आले, हे महाराष्ट्राचे भाग्य आहे, असे सांगितले. संचालक डॉ. देवरे यांनी ‘पुस्तकांचे गाव’ या मागील शासनाची भूमिका सांगितली. अरुण म्हात्रे यांनी ‘शिपाई’ कविता सादर केली. रमेश कीर यांनी स्वागत, प्रास्ताविक केले. आनंद शेलार यांनी आभार मानले. मालगुंड ग्रामपंचायतीत प्रथम पुस्तक दालनाचे उद्घाटन करण्यात आले.
साहित्य संमेलनासाठी पाच कोटीयापुढे बालसाहित्य संमेलन, युवा साहित्य संमेलन, महिला साहित्य संमेलन होईल. या प्रत्येक साहित्य संमेलनासाठी पाच-पाच कोटींची तरतूद केलेली आहे, असे त्यांनी सांगितले.
साहित्यिक हे सांस्कृतिक परंपरेचा पायामराठी भाषा ताकदवान करण्याचे काम साहित्यिकांनी केले आहे. देशाच्या सांस्कृतिक विभागाचा पाया हा साहित्यिक आहेत. साहित्यिक नसतील तर सांस्कृतिक क्षेत्र पुढे जाऊ शकत नाही. याचा अर्थ आपल्या सगळ्या सांस्कृतिक परंपरेचा पाया महाराष्ट्रातील साहित्यिक आहेत, असे सामंत म्हणाले.