खाेके प्रश्नावरून खेड नगर परिषदेची सभा वादळी ठरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:07 IST2021-09-02T05:07:36+5:302021-09-02T05:07:36+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क खेड : शहरातील सुपर मार्केटसह अन्य मोक्याच्या ठिकाणी शासकीय जागेत रातोरात खोके उभारण्यात आले असून, यासाठी ...

खाेके प्रश्नावरून खेड नगर परिषदेची सभा वादळी ठरणार
लाेकमत न्यूज नेटवर्क
खेड : शहरातील सुपर मार्केटसह अन्य मोक्याच्या ठिकाणी शासकीय जागेत रातोरात खोके उभारण्यात आले असून, यासाठी नगरपरिषद प्रशासनाची कुठल्याही प्रकारची परवानगी घेण्यात आली नसल्याचे समोर आले आहे. या खोकेप्रश्नी नगरपरिषदेत २ सप्टेंबर रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले असून, ही सभा वादळी ठरण्याची शक्यता आहे.
शहरात सुपर मार्केटमध्ये गेल्या १५ दिवसांत ७ खोके उभारण्यात आले आहेत. रातोरात उभारण्यात येणाऱ्या खोक्यांमुळे सुपर मार्केट पॅक झाले असून स्थानिक लोकप्रतिनिधींच्या वरदहस्तामुळेच खोक्यांची उभारणी केल्याचे पुढे आले आहे. सुपर मार्केटसह पंचायत समितीसमोरही यापूर्वी दोन खोके उभे करण्यात आले आहेत. या दोन्ही ठिकाणचे खोके नेमके कोणाचे हे अजूनही गुलदस्त्यातच आहे. सुपर मार्केट खोक्यांनी पॅक झाल्यानंतर मीनाताई ठाकरे नाट्यगृहासमोरील नगर वाचनालयानजीकही रातोरात खोका उभा करण्यात आला आहे.
शहरात नगर प्रशासनाची परवानगी न घेताच रातोरात उभ्या करण्यात येणाऱ्या खोक्यांमुळे अतिक्रमणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हे खोके कोणाच्या वरदहस्ताने उभारण्यात आले? याचा उलगडा अद्यापही झालेला नाही. मात्र, रातोरात उभ्या करण्यात येणाऱ्या खोक्यांना स्थानिक लोकप्रतिनिधींचाच वरदहस्त असल्यामुळेच एकामागोमाग एक खोके उभारले जात आहेत. या खोकेप्रश्नी नगरपरिषदेत २ सप्टेंबर रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. या बैठकीत खोक्यांचा विषय गाजणार असून हे खोके नेमके कोणाचे? याचे उत्तर नागरिकांना मिळणार आहे.