काँग्रेसप्रेमींची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:30 IST2021-03-20T04:30:05+5:302021-03-20T04:30:05+5:30
चिपळूण : तालुक्यातील काँग्रेसप्रेमींची बैठक शनिवार, २० मार्च रोजी आयोजित करण्यात आली आहे. येथील सावरकर सभागृहात सकाळी १० वाजता ...

काँग्रेसप्रेमींची बैठक
चिपळूण : तालुक्यातील काँग्रेसप्रेमींची बैठक शनिवार, २० मार्च रोजी आयोजित करण्यात आली आहे. येथील सावरकर सभागृहात सकाळी १० वाजता ही बैठक होणार आहे. यावेळी अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. या बैठकीला उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
गृह अलगीकरणाची सक्ती
रत्नागिरी : शिमगोत्सवात मुंबईहून येणाऱ्या चाकरमान्यांकडून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी कोरोनाबाधितांना गृहअलगीकरणात राहण्याची सक्ती केली आहे. तसेच संबंधितांच्या हातावर तसा शिक्का मारण्याचे आदेश दिले आहेत.
आगाराची ३३ लाखांची कमाई
चिपळूण : गेल्या आठ महिन्यांपासून् एस. टी. मालवाहतुकीला सुरुवात झाली आहे. येथील आगाराला मालवाहतुकीतून तब्बल ३३ लाख ३१ हजार ९०० रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. लॉकडाऊनच्या काळात एस.टी. सेवा बंद होती. मात्र, मालवाहतुकीने येथील एस. टी. आगाराला तारले आहे.
जिल्हा परिषदेत भीती
रत्नागिरी : जिल्हा परिषदेत कोरोना रुग्ण सापडल्याने विविध विभागांतील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्हा परिषदेत जिल्ह्यातील अनेक भागातून येणाऱ्या अभ्यागतांची संख्या लक्षणीय असते. त्यामुळे सध्या अभ्यागतांचे येणे थांबवावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
शतकोत्तर स्नेहसंमेलन
गुहागर : तेली समाजोन्नती संघ, चिपळूण व गुहागर तालुका यांच्या वतीने महाशिवरात्री शतकोमहोत्सवी स्नेहसंमेलन मुंबई, लालबाग येथील न्यू हनुमान थिएटर मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आले होते. तेली समाजोन्नती संघाचे अध्यक्ष वसंत पवार यांच्या अध्यक्षतेखाली हे स्नेहसंमेलन झाले.
घोलम यांची निवड
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील खडीकोळवण ग्रामपंचायतीच्या प्रभारी सरपंचपदाची जबाबदारी सलग पाचव्यांदा निवडून आलेले संतोष घोलम यांच्याकडे देण्यात आली आहे. येथील सरपंचपद तसेच उपसरपंचपद तांत्रिक कारणामुळे रिक्त राहिले आहे. सध्या घोलम यांच्याकडे हे प्रभारी पद देण्यात आले आहे.
पालख्या भक्त भेटीला
खेड : यावर्षी शिमगोत्सवावर कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासनाकडून काही नियम घालून देण्यात आले आहेत. त्यानुसार घरोघरी पालखी नेण्यासाठी प्रांताधिकारी यांची परवानगी घ्यावी लागणार आहे. मात्र, पालखीचे दर्शन होणार असल्याने भाविक समाधान व्यक्त करीत आहेत.
नमन मंडळ संभ्रमात
गुहागर : कोकणातील शिमगोत्सव हा आवडता सण. या उत्सवात खेळे हे परंपरेनुसार गाव भोवनीसाठी फिरतात. परंतु, यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जिल्हा प्रशासनाने घातलेल्या नवनवीन अटी आणि शर्ती यामुळे तालुक्यातील नमन मंडळांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
अपघाताला निमंत्रण
आवाशी : खेड शहरातील के. जी. एन. पार्ककडे जाणाऱ्या रस्त्याच्या मध्यभागी मोठा खड्डा पडला आहे. या खड्ड्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. काही जागरुक नागरिकांनी या खड्ड्याच्या ठिकाणी दगड लावून तात्पुरती सूचना देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, खेड नगर परिषदेकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
बालसंरक्षण समिती
रत्नागिरी : जिल्हा महिला बालविकास कार्यालयांतर्गत जिल्हा बालसंरक्षण कक्ष यांच्यामार्फत गावनिहाय ग्रामबालसंरक्षण समिती स्थापन करण्यात आल्या आहेत. या समितीचे प्रशिक्षण सुरू झाले आहे. तालुक्यातील गोळप ग्रामपंचायतीतून १६ मार्च रोजी प्रशिक्षण कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे.