रत्नागिरी : हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे जिल्ह्यात वादळ झाले नसले तरी बदललेले वातावरण, वादळसदृश वारे आणि पावसामुळे आंब्याची अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गळ झाली आहे. तोडणी करण्याइतपत तयार झालेला आंबा गळून पडत असल्याने बागायतदारांना मोठा फटका बसत आहे. त्यातच पावसामुळे आता पुन्हा आंब्यावर औषध फवारणी करावी लागणार आहे. या बदलत्या वातावरणात १५ ते २० टक्के आंबा पिकावर परिणाम झाला आहे.गेल्या आठवड्यात हवामान खात्याने वादळाचा इशारा दिला होता. प्रत्यक्षात वादळ झाले नसले तरी अनेक भागांत सोसाट्याचा वारा सुटला होता. या वाऱ्यासह अनेक ठिकाणी पावसानेही हजेरी लावली. काही ठिकाणी तुरळक, तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडला. त्यात आंब्याची मोठ्या प्रमाणात गळती झाली आहे. पडलेल्या आंब्याला बाजारात मागणी नसते. तो फक्त कॅनिंगलाच देता येतो. त्यामुळे बागायतदारांना फटका बसतो.गेली काही वर्षे हवामानात सातत्याने होणारे बदल आंबा पिकासाठी नुकसानकारकच ठरत आहेत. गतवर्षी लांबलेला पाऊस, थंडीने थोडक्यातच गुंडाळलेला आपला मुक्काम, यामुळे मुळातच आंबा पीक कमी आहे. त्यात मार्च महिन्यात आलेल्या उष्णतेच्या लाटेने आंबा भाजला. त्यामुळेही बागायतदारांना फटका बसला. आता थोडी परिस्थिती बदलत असताना, ऋतुचक्राच्या फेऱ्यातून वाचलेला आंबा काढणीयोग्य होत असताना वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने पुन्हा फटका बसला आहे.
१५ ते २० टक्के नुकसानमार्चमधील उष्णतेची लाट आणि आता फळाची गळती, यामुळे सुमारे १५ ते २० टक्के नुकसान झाले आहे. आधीच आंबा पीक कमी होते. त्यात या नैसर्गिक संकटामुळे अजूनच नुकसान झाले आहे. आंबा कमी असला तरी त्याला दर मात्र फारसा मिळत नसल्याची स्थिती आहे. हापूसपेक्षा इतर प्रकारचे आंबे स्वस्त असल्याने त्यांना अधिक मागणी आहे.
फवारणीचा खर्चसतत येणाऱ्या नैसर्गिक संकटांमुळे आंबा कलमांवर सतत फवारणी करावी लागत आहे. वातावरणात मळभ असेल, तर तुडतुड्यांसह अन्य प्रादुर्भाव होतो. त्यामुळे फवारण्या वाढतात. आता जिल्ह्यात अनेक भागांत पाऊस पडल्याने पुन्हा फवारण्या कराव्या लागणार आहेत. काही बागायतदारांनी त्या सुरूही केल्या आहेत.