मंडणगडला प्रशासकही नसल्याने पेच
By Admin | Updated: April 3, 2015 00:47 IST2015-04-02T21:56:31+5:302015-04-03T00:47:27+5:30
ग्रामस्थांची गैरसोय : ग्रामपंचायतीच्या नैमित्तिक कामांसाठी अधिकारी नाही

मंडणगडला प्रशासकही नसल्याने पेच
मंडणगड : नगर पंचायतीच्या घोषणेने ग्रामपंचायतीची सत्ता संपुष्टात येणार असल्याने ग्रामपंचायतीचा नैमित्तिक कारभार सांभाळण्याचा घटनात्मक पेच निर्माण झाला आहे. याठिकाणी अद्यापही प्रशासक न नेमल्याने ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे.नगर व ग्रामविकास खात्याच्या १९ मार्च २०१५च्या आदेशाने कारभारात मोठे फेरबदल झाले आहेत. ग्रामपंचायतीचा नैमित्तिक कारभार चालवण्यासाठी कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असतानाच, प्रशासनाकडून अध्यादेशाच्या तेरा दिवसानंतरही प्रशासकीय नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे समस्यांमध्ये दिवसागणिक भर पडत आहे.या संदर्भातील परिस्थिती अशीच राहिल्यास शहरातील कचरा व्यवस्थापन व पाणी वाटपाची समस्या गंभीर रुप धारण करणार आहे़ शहरात दररोज हजारो किलो कचरा निर्माण होतो. या समस्येवर मात करण्यासाठी गेली दोन वर्षे ग्रामपंचायतीची कचरागाडी शहरातील विविध भागात फिरते व कचरा गोळा करते. ग्रामपंचायतीकडे या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी डंपिंग ग्राऊंड नसल्याने शहराच्या बाहेर माहू गावाच्या हद्दीत कचरा टाकण्याची सोय करण्यात आले होती. याशिवाय गावाबाहेर असलेल्या चिरा खाणीतील खड्ड्यांमध्ये हा कचरा टाकला जात होता.नगरपंचायतीच्या घोषणेनंतर ग्रामस्थांनी चिरेखाणीतील खड्ड्यात गाडीतून गोळा केलेला कचरा टाकण्यास मज्जाव केला आहे. खाणीतील कचऱ्यातील मांस खाण्यासाठी गोळा होणाऱ्या जनावरांमुळे शेतीसही उपद्रव होऊ लागल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. ग्रामस्थांच्या अचानक बदलेल्या पवित्र्यामुळे शहरात गोळा होणारा कचरा तुळशी घाटात बेकायदेशीर टाकला जात आहे. शहराची नळपाणी योजना चाळीस वर्षांपासून कार्यरत असल्याने या योजनेच्या मुख्य जलवाहिनीला वारंवार गळती लागत असते.याशिवाय पंप नादुरुस्त होण्याचा धोकाही असतो. बुधवारी सकाळी मुख्य जलवाहिनीत दोष निर्माण झाल्याने शहरातील स्टँड व दुर्गवाडी परिसराला पाणी पुरवठा झालेला नाही व सद्यस्थितीत ग्रामपंचायतीस कोणीही वाली नसल्याने या परिस्थतीत सुधारणेची अपेक्षा करणेही व्यर्थ आहे.एका अर्थाने हा कालावधी मंडणगड ग्रामपंचायतीसाठी संक्रमणाचा कालावधी म्हणावा लागेल. ग्रामपंचायतीचा नैमित्तिक कारभार चालवण्यासाठी करावे लागणारे खर्च व उद्भवणाऱ्या प्रासंगिक अडचणींचा विचार करता कर्मचारी वर्ग कोणत्याही प्रकारचा धोका पत्करू शकत नाही. त्यामुळे समस्या सोडवण्याच्या दृष्टीने कोणतीही पावले उचलली जाणे कठीण वाटत आहे.
महसूल प्रशासनाने शहरातील सध्याची परिस्थिती बदलण्यासाठी तातडीने उपाय करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे़ पाणी व कचऱ्याची समस्या गंभीर रुप धारण करण्याची शक्यता अधिक असल्याने प्रशासक नेमणे शक्य नसल्यास विद्यमान सरपंचांना नैमित्तिक कामे मार्गी लावण्यासाठी काळजीवाहू कारभार पाहण्याचे अधिकार देण्याची मागणी पुढे येत आहे़
तहसील कार्यालयात संपर्क साधला असता, तहसीलदार बाहेरगावी असल्याचे सांगण्यात आले. निवासी नायब तहसीलदार कांबळे यांनी माहिती देताना मंत्रालयातील माहिती दिली. प्रशासकीय नियुक्तीचा शासन स्तरावरील आदेश केव्हाही होऊ शकतो.
यासाठी तहसील कार्यालय वरिष्ठांच्या प्रतिक्षेत असल्याचे मत संबंधित विभागातील अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
मूलभूत समस्यांवर उपाय हवेत...
मंडणगडला विकासाचे वेध लागले असून, नगरपंचायतीच्या माध्यमातून नगरवासियांचे अनेक प्रश्न सुटतील व वर्षानुवर्षे ग्रामीण भागात नोंद होणाऱ्या मंडणगडची नगरामध्ये निर्मिती केली जाणार आहे. अशा माध्यमातून हा विकास सहज शक्य होणार आहे. आता प्रक्रिया राबविण्याचे प्रयत्न सुरू असून गेली दोन वर्षे सातत्याने प्रयत्न करून आता नगरपंचायत निर्मितीसाठीची प्रक्रिया पूर्ण होत आहे.