कळंबणी उपजिल्हा रुग्णालयाचा कारभार बेभरोसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:31 IST2021-04-11T04:31:11+5:302021-04-11T04:31:11+5:30

खेड : तालुक्यातील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांवर योग्य ते उपचार केले जात नसल्याच्या अनेक तक्रारी येत ...

The management of Kalambani sub-district hospital is unreliable | कळंबणी उपजिल्हा रुग्णालयाचा कारभार बेभरोसे

कळंबणी उपजिल्हा रुग्णालयाचा कारभार बेभरोसे

खेड : तालुक्यातील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांवर योग्य ते उपचार केले जात नसल्याच्या अनेक तक्रारी येत असल्याने या रुग्णालयात कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांची जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी चौकशी करावी, अशी मागणी रुग्णांच्या नातेवाइकांनी केली आहे. सद्य:स्थितीत तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता हे रुग्णालय रुग्णांसाठी संजीवनी ठरणारे आहे. मात्र, येथील वैद्यकीय अधिकारी रुग्णांच्या जीवाशी खेळत असतील तर रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांचा वाली कोण, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

मुंबई - गोवा महामार्गालगतच्या कळंबणी येथे असलेले उपजिल्हा रुग्णालय हे खेड तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील पोलादपूर, तसेच मंडणगड तालुक्यातील जनतेसाठी संजीवनी ठरणारे आहे. या रुग्णालयात अत्यावश्यक त्या सुविधेची उपकरणेही उपलब्ध आहेत. त्यामुळे याठिकाणी येणाऱ्या रुग्णांना चांगली आरोग्य सेवा मिळू शकते. मात्र, या ठिकाणचे वैद्यकीय अधिकारी रुग्णांची योग्य प्रकारे देखभाल करत नसल्याने या ठिकाणी उपचार घ्यायला जायचे की नाही याचा विचार रुग्ण आणि त्याच्या नातेवाइकांना करावा लागतो आहे. या रुग्णालयाचा दूरध्वनी गेले कित्येक वर्ष मृतावस्थेत आहे. त्यामुळे या रुग्णालयात कुणाशी संपर्क साधायचा असेल तर तो कोणाशी साधायचा, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांना किंवा इतर कर्मचाऱ्यांना त्यांच्या मोबाइलवर संपर्क करायचा विचार केला तर तेही शक्य नाही. येथील वैद्यकीय अधिकारी कायम नॉट रिचेबल असतात त्यामुळे एखाद्या इमर्जन्सीच्या वेळेला रुग्ण किंवा त्याच्या नातेवाइकांनी करायचे काय हा प्रश निर्माण होतो.

गेल्या बुधवारी थंडी ताप असलेल्या एका युवकाला या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. त्याच्या तापाची लक्षणे कोरोनासदृश असल्याने त्याची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली होती. रिपोर्ट यायचा असल्याने त्याला जनरल वॉर्डमध्ये ठेवण्यात आले होते. यादरम्यान त्याला थंडी वाजू लागली, श्वास घ्यायला प्रचंड त्रास होत होता. तो युवक उपचारांसाठी वैद्यकीय अधिकारी आणि नर्सेस यांना ओरडून ओरडून सांगत होता. मात्र, त्याच्याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नव्हते. त्याच्या नातेवाइकांना हे कळल्यानंतर त्यांनी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षकांकडे सातत्याने संपर्क साधण्याच्या प्रयत्न केला. मात्र, त्यांनी आपला मोबाइल क्रमांक डायव्हर्ट करून ठेवलेला होता. अखेर त्या युवकाच्या नातेवाइकांनी त्याला दुसऱ्या रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयातील या भाेंगळ कारभाराबाबत नाराजीचा सूर उमटत असून, रुग्णांना उपचारासाठी न आणण्याच्या निर्णयापर्यंत नातेवाईक आले आहेत.

काेट

शासकीय रुग्णालयात काम करण्याऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णावर योग्य प्रकारे उपचार करायलाच हवेत. त्यांचे ते कामच आहे. सध्याच्या कोरोनाच्या काळात तर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णांची विशेष खबरदारी घ्यायला हवी; परंतु जर कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची हेळसांड होत असेल तर ते योग्य नाही. तसं काही होत असेल तर त्याची चौकशी केली जाईल.

- डॉ. संघप्रिया फुले, जिल्हा शल्यचिकित्सक, रत्नागिरी.

Web Title: The management of Kalambani sub-district hospital is unreliable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.