भातावरील प्रमुख किडी व त्यांचे नियंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:08 IST2021-09-02T05:08:49+5:302021-09-02T05:08:49+5:30
रत्नागिरी : हवामानातील बदलामुळे किडी व रोगांचा प्रादुर्भाव भातावर होत असतो. वेळीच किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना न केल्यास ...

भातावरील प्रमुख किडी व त्यांचे नियंत्रण
रत्नागिरी : हवामानातील बदलामुळे किडी व रोगांचा प्रादुर्भाव भातावर होत असतो. वेळीच किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना न केल्यास उत्पादनावर परिणाम होतो. एकूणच उत्पादकता वाढविण्यासाठी खत व्यवस्थापनाबरोबर कीड रोग नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनाही आवश्यक आहे.
करप्या रोगाप्रमाणे कडा करपा या रोगाचाही प्रादुर्भाव होऊ शकतो. हा रोग जीवाणूजन्य असून, झॅन्थोमोनास ओरायझी पीव्ही ओरायझी या जीवाणूमुळे उद्भवतो. या रोगाचा प्रादुर्भाव भातपिकावर रोपवाटिकेपासून दाणे भरण्याच्या काळापर्यंत केव्हाही आढळतो. रोगाच्या प्राथमिक अवस्थेत पानाच्या कडा करपतात. कालांतराने करपलेला भाग पानांच्या मध्ये शिरेपर्यंत वाढतो. रोगाची सुरुवात पानांच्या कडेपासून होत असल्याने या रोगास ‘कडा करपा’ असे म्हटले जाते. पानांच्या अंतर्भागात रोगकारक जीवाणूंची संख्या वाढून हे जीवाणू पानांच्या पृष्ठभागावर पसरतात. यामुळे असंख्य जीवाणू असलेले दुधाळ रंगाचे अनेक थेंब पानांच्या पृष्ठभागावर साठलेले दिसतात. कालांतराने हे थेंब सुकून पानावर टणक बनतात.
अनुकूल वातावरणात जीवाणूंची संख्या वाढल्याने चुडातील रोपांची पाने करपून मरतात. याला रोगाची ‘मर’ अवस्था (क्रेसेक) म्हणतात. रोगाचा प्रादुर्भाव पीक फुलोऱ्यात असताना अथवा दाणे भरण्याच्या अवस्थेत झाल्यास लोंबीतील बहुतांश दाणे भरत नाहीत. पाने करपल्यामुळे प्रकाश संश्लेषण क्रियेत अडथळा निर्माण होऊन लोंबीतील अपरिपक्व दाण्यांचे प्रमाण वाढते. यामुळे उत्पादनात २० ते ६० टक्के घट येण्याची शक्यता असते. नत्र खताच्या अतिरेक वापरामुळे रोगाचे प्रमाण वाढते. रोगाचा प्रादुर्भाव व प्रसार होण्यास तापमान हे २५ ते ३० अंश सेल्सिअस, हवेतील सापेक्ष आर्द्रता ९० टक्के अथवा त्यापेक्षा अधिक, अधूनमधून पडणारा मुसळधार पाऊस व वेगाने वाहणारा वारा, आदी वातावरणातील घटक कारणीभूत ठरतात. कडा करपा या रोगापासून बचाव करण्यासाठी रोगमुक्त बियाणे पेरणीसाठी वापरावे. या रोगाचे जीवाणू रोपास झालेल्या जखमांमधून शिरकाव करतात. म्हणून रोपवाटिकेतून रोपे उपटताना मुळांना इजा होणार नाही, याची दक्षता घ्यावी. ज्या ठिकाणी रोगाचा प्रादुर्भाव आढळतो, तेथे रोपांचे लावणीच्या वेळी शेंडे खुडू नयेत. बियाण्यास मिठाच्या द्रावणाची प्रक्रिया करावी.
सुधारित वाणांची निवड
बियाण्यास प्रति किलो २.५ ते ३ ग्रॅम या प्रमाणात कॅप्टॉन किंवा थायरम हे बुरशीनाशक पेरणीपूर्वी चोळावे. सतत रोग येणाऱ्या भागात लागवडीसाठी शक्यतो रोगास जास्त बळी पडणाऱ्या भात जातीची उदा. झिनिया, तायचूंग, भडस, कोलंब या सारख्या वाणाची लागवड करू नये. लागवडीसाठी रोगप्रतिकारक किंवा रोगास कमी बळी पडणाऱ्या सुधारित भात जातींची निवड करावी. शिफारशीनुसार नत्र खते वापरावीत. राेगग्रस्त शेतातून नत्र खताचा वापर टाळावा.
कीटकनाशक फवारणी
रोगग्रस्त शेतातून नत्र खतांचा वापर थोडा उशिरा व विभागून द्यावा. भात खाचरात फार काळ पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. या रोगाचे पूर्णपणे नियंत्रण करणे अवघड आहे. परंतु, ०.२५ टक्के कॉपर ऑक्सी क्लोराईड सोबत ॲग्रोमायसीन या प्रति जैविकाच्या ५० पीपीएम तीव्रतेच्या किंवा स्ट्रेप्टोसायक्लीन या २५ टक्के पीपीएम तीव्रतेच्या द्रावणाची फवारणी केल्यास रोगाची तीव्रता कमी करता येते.
शेंडे करपा
भातावरील तिसरा महत्त्वाचा रोग म्हणजे शेंडे करपा (लिफस्काल्ड), हा बुरशीजन्य रोग आहे. रोगग्रस्त शेतातून नत्र खताचा वापर टाळावा अथवा हप्ता थोडा उशिरा व विभागून द्यावा. भात खाचरात फार काळ पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. या रोगाचे पूर्णपणे नियंत्रण करणे अवघड आहे. परंतु, ०.२५ टक्के काॅपर ऑक्सिक्लोराईडसोबत ॲग्रोमायसीन या प्रतिजैविकाच्या ५० पीपीएम तीव्रतेचे किंवा स्ट्रेप्टोसायक्लीनचे २५ पीपीएम द्रावण फवारावे.