लोकमंच : भारतीय संस्कृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:29 IST2021-05-24T04:29:42+5:302021-05-24T04:29:42+5:30

माणूस मात्र जसा भौतिक सुखाच्या मागे लागला, व्यवसायानिमित्त बाहेर पडून धावपळ-धडपड करू लागला तसतसा या संस्कृतीला तो विसरू लागला. ...

Lokmanch: Indian Culture | लोकमंच : भारतीय संस्कृती

लोकमंच : भारतीय संस्कृती

माणूस मात्र जसा भौतिक सुखाच्या मागे लागला, व्यवसायानिमित्त बाहेर पडून धावपळ-धडपड करू लागला तसतसा या संस्कृतीला तो विसरू लागला. सणवार, व्रतवैकल्ये यामध्ये वेळ घालवणे त्याला मूर्खपणाचे वाटू लागले, विज्ञानाच्या नावाखाली मानवाने आपले संस्कार, अध्यात्म सगळे पायदळी तुडवले; पण या लॉकडाउनच्या काळात कुठेतरी हरवत चाललेली आपली संस्कृती परत नव्याने उभारी घेऊ लागली आहे. लोक आरोग्याबाबतीत सजग झाले आहेत, आहार- विहार, व्यायाम याचा स्वीकार करू लागले आहेत. भारतीय योग, आयुर्वेद हे परदेशी लोकांनी डोक्यावर घेतलेले ज्ञान आता

कुठे आमच्या ध्यानी येऊ लागले आहे.

कोरोनाच्या काळात परदेशी शेकहॅण्डला आम्ही राम राम केला, रूम फ्रेशनरची जागा कापूर धुपाने घेतली, कोल्ड कॉफी, चहाची जागा आयुर्वेदिक

काढ्याने घेतली, ही पूर्वीपासून आपल्याजवळील संस्कृती होती, परत एकदा तिला आपण जवळ करतोय. एकीकडे मानव जसजसा विज्ञान-तंत्रज्ञानात भरारी घेऊ लागला. भौतिक सुखापायी निसर्गाची कत्तल करू लागला. तसतसा तो अधोगतीकडे वळू लागला. बेसुमार जंगल तोडीमुळे जागतिक तापमानवाढ, पाणी समस्या, जमिनीची धूप यासारख्या समस्यांना आपल्याला तोंड द्यावे लागत आहे. याचा परिणाम अन्नसाखळीवरही होऊ लागला. पुढील काही वर्षांत आपल्याला पाठीवर ऑक्सिजनचे नळकांडे घेऊन फिरावे लागेल, असे कोणी भाकीत केले असते तर ते आपल्याला हस्यास्पद

वाटले असते; पण कोरोनाच्या काळात याची प्रचिती आपण घेत आहोत. ऑक्सिजनसाठी चाललेली धावपळ पाहिली की, आपण निसर्गावर केलेले अत्याचार आठवत राहतात.

मोठमोठी वड, पिंपळाची झाडे रस्ता रुंदीकरणात नष्ट झाली आणि वातावरणातील ऑक्सिजन कमी होऊ लागला, यासाठी आपण वेळीच सजग झाले पाहिजे. पुढील महिन्यात वटपौर्णिमा येत आहे तेव्हा समस्त महिलांना मी आवाहन करू इच्छिते की, या दिवशी वडाची फांदी तोडून तिची पूजा करण्यापेक्षा वडाचे रोप लावून पुढील भावी पिढीसाठी ऑक्सिजन बँक निर्माण करूया, 'निसर्ग देवो भव' ही आपली भारतीय संस्कृती खूपच महान आहे, तिचा विकास करायचा असेल तरच कंबर कसावी लागणार आहे, ही संस्कृती जपताना आपण यातील वैज्ञानिक दृष्टी पुढच्या पिढीत संक्रमित करूया व या संस्कृतीला एक नवीन दर्जा प्राप्त करून देऊया.

चला तर मग जपूया, आपल्या भारतीय संस्कृतीला

कास धरूया, विज्ञान-अध्यात्माच्या आधुनिकतेला...

सविता सर्जेराव पाटील

प्राथमिक शिक्षिका, लांजा

Web Title: Lokmanch: Indian Culture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.