मंडणगड : जगभरातून अभ्यासक, पर्यटक येतील असे भव्य-दिव्य स्मारक बाबासाहेबांच्या आंबडवे गावी उभारले जाईल. हे स्मारक बाबासाहेबांच्या विचारांचे असेल, ज्ञानस्मारक असेल. बाबासाहेबांच्या विचाराला तडा घालण्याचा जो प्रयत्न करेल, त्याला महाराष्ट्र सरकार नक्की शासन करेल, अशी ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.मंडणगड तालुक्यातील आंबडवे येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे साजरी करण्यात आली. पालकमंत्री सामंत यांच्या हस्ते सर्वप्रथम ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर मंत्री सामंत आणि राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. बाबासाहेबांच्या अस्थिकलश स्थानीही पुष्पहार अर्पण करण्यात आला.यानंतर झालेल्या कार्यक्रमात पालकमंत्री सामंत म्हणाले की, गेल्या तीन वर्षांपासून आंबडवेमध्ये शासकीय जयंती साजरी होतेय, याचा मला अभिमान आहे. बाबासाहेबांमुळेच मी आमदार, मंत्री होऊ शकलो, त्यांचे गाव माझ्या जिल्ह्यात आहे, याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजतो.बाबासाहेबांचे जागतिक स्तरावरचे स्मारक या ठिकाणी होईल. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून निधी मिळेल. हे स्मारक जगातील अभ्यासक, पर्यटकांना आकर्षित करेल, असेही मंत्री सामंत यांनी सांगितले.
अमली पदार्थमुक्त राहाबाबासाहेबांनी समतेचा, शिक्षणाचा, व्यसनमुक्तीचा संदेश दिला. याच विचारावर अमली पदार्थविरोधी मोहीम जिल्ह्यात सुरू केली आहे. राज्यातला अमली पदार्थमुक्त आपला जिल्हा पाहिला करू या. खऱ्या अर्थाने घटनाकरांची ही विचारपूर्ती असेल. बाबासाहेबांचे विचार अधिक वेगाने पोहोचविण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे. ती प्रामाणिकपणाने पार पाडू या, असेही पालकमंत्री म्हणाले.
जिल्हाधिकारी गैरहजर?आंबडवे येथे आगमन झाल्यानंतर पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्याविषयी चौकशी केली. शासकीय कार्यक्रम असताना जिल्हाधिकारी नाहीत का, असा प्रश्नही त्यांनी केला.