कुष्ठ रूग्णालय कर्मचाऱ्यांची उपासमार

By Admin | Updated: January 6, 2015 00:45 IST2015-01-05T22:48:12+5:302015-01-06T00:45:29+5:30

प्रजासत्ताक दिनी उपोषण : शासनाचे उंबरठे झिजवूनही ५ ते १९ महिन्यांचे वेतन रखडले

Leprosy employees' famine | कुष्ठ रूग्णालय कर्मचाऱ्यांची उपासमार

कुष्ठ रूग्णालय कर्मचाऱ्यांची उपासमार

रत्नागिरी : तीन वर्षे उलटून गेली तरीही येथील कुष्ठ रूग्णालयाच्या पाच कर्मचाऱ्यांचे वेतन शासनाने न दिल्यामुळे या कर्मचाऱ्यांची उपासमार होत आहे. याबाबत सातत्याने शासनाचे उंबरठे झिजवूनही मागील ५ ते १९ महिन्यांचे वेतन रखडल्याने आता या कर्मचाऱ्यांनी येत्या प्रजासत्ताक दिनी बेमुदत उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे.
सर दि. मा. पेटिट यांनी कुष्ठरूग्णांना निवारा मिळवून देण्यासाठी रत्नागिरीत रूग्णालय उभारले. यात अनेक रूग्ण उपचार घेत असतानाच काही सेवाभावी संस्थांच्या मानवतावादामुळे तसेच आर्थिक मदतीमुळे येथे आपले जीवन व्यतित करीत होते. मात्र, महाराष्ट्रात कुष्ठरोगाचे निमुर्लन झाल्याचा दावा करीत महाराष्ट्रातील उस्मानाबाद, कोल्हापूरसह रत्नागिरीचे कुष्ठ रूग्णालय बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे येथील रूग्णालयातील दीपक नागवेकर (कुष्ठरोग तंत्रज्ञ), अविनाश रांगणकर (कनिष्ठ सहाय्यक), सुधाकर रसाळ (स्वयंपाकी), वनिता पवार, ताराबाई राठोड (दोघीही सफाई कामगार) यांना अतिरिक्त ठरविण्यात आले. या सर्वांचे मार्च २०११ पर्यंतचे वेतन व भत्ते देण्यात आले. त्यानंतर मात्र या रूग्णालयाचे अनुदान बंद करण्यात आले.
येथील रूग्णांनी शासनाच्या म्हणण्यानुसार इतरत्र जाण्यास नकार दिला. त्यामुळे मानवतेच्या दृष्टीकोनातून ही मंडळी या रूग्णालयातील कुष्ठ रूग्णांना सेवा देत राहिली. परंतु त्यांची दखल ना आरोग्य विभागाने घेतली ना लोकप्रतिनिधीनी. यापैकी स्वयंपाकी सुधाकर रसाळ यांचे जानेवारी २०१२ ते जुलै २०१३ (१९ महिने) या कालावधीतील, तर अनिवाश रांगणकर यांचे जानेवारी २०१२ ते मे २०१३ (१७ महिने) आणि उर्वरित तिघांचे जानेवारी ते मे २०१२ या पाच महिन्यांचे वेतन रखडले आहे. याबाबत तत्कालीन पालकमंत्री उदय सामंत यांच्या जनता दरबारात तसेच शासनाकडे वारंवार निवेदन देऊनही या कर्मचाऱ्यांची कैफियत ऐकली गेली नाही.
अखेर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी धरणाधिकार वापरून या पाचही कर्मचाऱ्यांच्या पदस्थापना जिल्ह्यात अन्यत्र केल्या. मात्र, यापैकी वनिता पवार, दीपक नागवेकर हे सेवानिवृत्त झाले. उर्वरितांनी सेवानिवृत्तीला काही वर्षे शिल्लक असताना सेवानिवृत्ती घेतली. मात्र, अजूनही त्यांचे मागील वेतन मिळालेले नाही. त्यामुळे त्यांची उपासमार होत आहे. (प्रतिनिधी)

कुष्ठरोग तंत्रज्ञ म्हणून कार्यरत असलेले दीपक नागवेकर यांची पत्नी सध्या कॅन्सरने त्रस्त आहे. त्यामुळे तिच्या उपचारासाठी नागवेकर यांना पैशांची नितांत गरज आहे. याबाबत त्यांनी वैयक्तिक स्तरावरही सर्वत्र निवेदन दिली. मात्र, त्याची अद्याप कुठलीच दखल घेतलेली नाही. याचा निषेध म्हणून प्रजासत्ताकदिनी उपोषण करण्यात येणार आहे.


दीपक नागवेकर (कुष्ठरोग तंत्रज्ञ) यांचे पाच महिन्याचे एकूण १,८२,९१०, अविनाश रांगणकर (कनिष्ठ सहाय्यक) यांचे १७ महिन्याचे ३,६६,२८२, सुधाकर रसाळ (स्वयंपाकी) यांचे १९ महिन्याचे ३,०१,६३०, वनिता पवार आणि ताराबाई राठोड (सफाई कामगार) या दोघींचे पाच महिन्यांचे अनुक्रमे ८२,३७१ आणि ८१,०२१ एवढे वेतन शासनाकडे थकीत आहे.

अनुदानाची रक्कम मिळणार का, अशी सर्वांनाच शंका असल्याने जिल्हा परिषदेच्या मंजूर अनुदानानुसार संगणक वितरण प्रणालीवर महाराष्ट्र कोषागार नियम ४४ नुसार बी. डी. एस. स्लीप निघत नसल्याने या कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यात आलेले नाही.
- दीपक नागवेकर

Web Title: Leprosy employees' famine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.