कोंबड्यांच्या शिकारीच्या नादात बिबट्या घुसला थेट घरात, दोघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2021 18:15 IST2021-11-27T18:14:56+5:302021-11-27T18:15:25+5:30
कोंबड्या खाण्याच्या नादात बिबट्या चक्क घरातच घुसला. चिपळूण तालुक्यातील पाते पिलवली गव्हाणवाडी येथे हा प्रकार घडला.

कोंबड्यांच्या शिकारीच्या नादात बिबट्या घुसला थेट घरात, दोघे जखमी
अडरे : कोंबड्यांच्या शिकारीच्या नादात बिबट्या चक्क घरातच घुसला. चिपळूण तालुक्यातील पाते पिलवली गव्हाणवाडी येथे हा प्रकार घडला. अन् सर्वांचीच घाबरगुंडी उडाली. यावेळी घरात शिरलेल्या बिबट्याने पती पत्नीवर हल्ला चढवून जखमी केले. दोन दिवसापुर्वी ही घटना घडली.
पाते पिलवली गव्हाणवाडी येथील तुकाराम गंगाराम सुवरे (५०) यांच्या घरात हा बिबट्या शिरला होता. कोंबडीचा पाठलाग करत बिबट्या सुवरे यांच्या घरात आला. बिबट्याच्या उडीचा आवाज ऐकून घरातील सुनिता सुवरे जाग्या झाल्या. त्यांनी लाईट लावताच त्यांना बिबट्या दिसला. त्यांनी आरडोओरडा करताच बिबट्या बेडखाली लपून बसला. तर बेड हलताच बिबट्याने तुकाराम व त्यांच्या पत्नी सुनिता यांच्यावर हल्ला केला.
बिबट्याने त्यांच्या डोक्यात पंजा मारल्याने त्या जखमी झाल्या. जखमी अवस्थेतच सुनिता, तुकाराम आणि मुलगा आरडाओरडा करत घराबाहेर पडले. ग्रामस्थांनी जखमी पती-पत्नीला डेरवण येथील रूग्णालयात नेले. त्यांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, घरात शिरलेल्या बिबट्याने जंगलात पळ काढला. याबाबतची माहिती वनविभागाला दिल्यानंतर अधिकार्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. बिबट्याच्या संचारानंतर या भागात रात्रीची गस्त घालण्यास सुरूवात करण्यात आली आहे.