बेरोजगारांना त्रास द्याल तर कायदेशीर कारवाई, पालकमंत्री उदय सामंत यांचा बँकांना इशारा

By शोभना कांबळे | Published: March 13, 2024 01:57 PM2024-03-13T13:57:17+5:302024-03-13T13:57:36+5:30

रत्नागिरी : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत तरुण बेरोजगारांची कर्ज प्रकरणे बँकांकडे आल्यानंतर त्यांना नाहक त्रास देणाऱ्या बँकांवर कायदेशीर कारवाई ...

Legal action if harassing the unemployed, Guardian Minister Uday Samant warning to banks | बेरोजगारांना त्रास द्याल तर कायदेशीर कारवाई, पालकमंत्री उदय सामंत यांचा बँकांना इशारा

बेरोजगारांना त्रास द्याल तर कायदेशीर कारवाई, पालकमंत्री उदय सामंत यांचा बँकांना इशारा

रत्नागिरी : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत तरुण बेरोजगारांची कर्ज प्रकरणे बँकांकडे आल्यानंतर त्यांना नाहक त्रास देणाऱ्या बँकांवर कायदेशीर कारवाई करु, असा इशारा पालकमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी आढावा बैठकीत दिला.

राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी शासकीय विश्रामगृहात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत मंगळवारी बैठक घेऊन आढावा घेतला. जिल्ह्याचे एकूण उद्दिष्ट ९६५ असून, त्यापैकी ६४५ प्रकरणे मंजूर झाली आहेत. एकूण ३ हजार ३६ अर्ज आले आहेत. त्यापैकी १ हजार १३६ प्रकरणे बँकांकडून प्रलंबित ठेवण्यात आली आहेत. शिवाय १५४० प्रकरणे नाकारण्यात आली आहेत.

यात खासगी बँकांचा अधिक समावेश आहे. शासकीय बँकांची कामगिरी उल्लेखनीय आहे. बँक आॕफ इंडियाने १८८, बँक आॕफ महाराष्ट्र १३३, स्टेट बँक आॕफ इंडिया ५९, युनियन बँक आॕफ इंडिया ६३, विदर्भ कोकण ग्रामीण बँक ८९ प्रकरणे मंजूर केली आहेत.

पालकमंत्री सामंत आढावा घेताना म्हणाले की, ५ टक्के रक्कम लाभार्थ्याची,  ३५ टक्के रक्कम शासनाची असताना आणि या प्रकारणात शासन शिफारस करत असुनही अशी प्रकरणे कोणत्या आधारावर नाकारली जात आहेत?. ज्या बँकांची कामगिरी शून्य आहे, त्याचबरोबर ज्या खासगी बँकांनी दिलेले उद्दिष्ट पूर्ण केले नाही, प्रकरणे नाकारली आहेत, अशा प्रकरणात तरुण बेरोजगारांना नाहक त्रास देण्याचा उद्देश दिसतो. अशा बँकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. त्याचबरोबर अशा बँकांमधील शासकीय खाती काढून घेतली जातील, असा इशाराही त्यांनी दिला.

१४ तारखेपर्यंत बँकांना दिलेले जिल्ह्याचे उद्दिष्ट १०० टक्के पूर्ण झाले पाहिजे, असेही पालकमंत्री म्हणाले. या बैठकीला जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक एच.एन.आंधळे, विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे वरिष्ठ प्रबंधक सूर्यकांत साठे यांच्यासह विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Web Title: Legal action if harassing the unemployed, Guardian Minister Uday Samant warning to banks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.