हसत-खेळत गणित शिकवणे गरजेचे
By Admin | Updated: January 29, 2015 23:40 IST2015-01-29T22:13:20+5:302015-01-29T23:40:22+5:30
रत्नागिरीत गणित अध्यापकांचे राज्यस्तरीय अधिवेशनाचे नगराध्यक्षांहस्ते उद्घाटन

हसत-खेळत गणित शिकवणे गरजेचे
रत्नागिरी : विद्यार्थ्यांसाठी गणित हा विषय कंटाळवाणा न होता हसत - खेळत, गाण्यातून व अधिक सोप्या पध्दतीने कसा शिकविता येईल, याबाबत गणित विषयाच्या शिक्षकांनी अधिक संशोधन करण्यावर भर द्यायला हवा, असे विचार महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळ संलग्न गणित अध्यापकांच्या ३८व्या राज्यस्तरीय अधिवेशनात आज मान्यवरांनी मांडले.
येथील स्वामी समर्थ मंगल कार्यालयात आयोजित या दोन दिवशीय अधिवेशनाचे उद्घाटन रत्नागिरीचे नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष अॅड. विलास पाटणे होते. व्यासपीठावर महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळाचे अध्यक्ष डी. बी. टारे, कार्यवाह व्ही. एस. शिंदे, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) पवार व विज्ञान पर्यवेक्षक गाऊंड तसेच महामंडळाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रताप सुर्वे आदी मान्यवर उपस्थित होते.
नगराध्यक्ष महेंद्र मयेकर उद्घाटनपर भाषणात म्हणाले, गणित हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. मात्र, अनेकांना हा विषय कठीण जातो. त्यामुळे हा विषय अधिक सोपा करून, मनोरंजक पध्दतीने शिकवण्यावर भर देणे गरजेचे आहे. अध्यक्षीय भाषणात अॅड. पाटणे यांनीही गणित विषयाचे महत्त्व विषद केले. प्रास्ताविक प्रताप सुर्वे यांनी केले. सूत्रसंचालन इम्तियाज सिध्दिकी व अमोल टाकळे यांनी केले. उद्घाटनप्रसंगी गणितविषयक पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
उद्घाटनानंतरच्या सत्रात शास्त्रज्ञ डॉ. राजेंद्र कुंभार यांनी ‘गणित विषयाचे व्याकरण’ यावर मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात नितीन ओक यांनी मार्गदर्शन केले. उद्या (३० जानेवारी) राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा, माध्यमिक व उच्च माध्यमिक गणित यांचा सेतूबंध, शैक्षणिक साधन निर्मिती सादरीकरण, शंका समाधान असे कार्यक्रम होणार आहेत. तसेच गणित हा विषय अधिक सोपा बनविणारे पुणे येथील गणित तज्ज्ञ लक्ष्मण गोगावले यांचेही मार्गदर्शन होणार आहे. (प्रतिनिधी)