लेट लतीफ कर्मचाऱ्यांची आता गय नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:29 IST2021-03-20T04:29:56+5:302021-03-20T04:29:56+5:30
देवरुख : सभापती म्हणून निवडून आल्यानंतर पहिल्याच दिवशी संगमेश्वरचे सभापती जया माने यांनी पंचायत समितीमधील लेटलतीफ कर्मचाऱ्यांना चांगलाच दणका ...

लेट लतीफ कर्मचाऱ्यांची आता गय नाही
देवरुख :
सभापती म्हणून निवडून आल्यानंतर पहिल्याच दिवशी संगमेश्वरचे सभापती जया माने यांनी पंचायत समितीमधील लेटलतीफ कर्मचाऱ्यांना चांगलाच दणका दिला. त्यांनी पहिल्या टप्प्यात ६ जणांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या कारवाईमुळे कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
संगमेश्वरचे सभापती म्हणून जया माने यांची मंगळवारी निवड झाली. बुधवारचा दिवस पदभार स्वीकारण्यात तसेच सत्कारात गेला. यामुळे गुरूवारपासून त्यांनी कामकाजाला सुरूवात केली. सकाळी ९.३० वाजता ते कार्यालयात हजर झाले. यावेळी कर्मचाऱ्यांची उपस्थितीही तुरळक होती. सकाळी १० वाजल्यानंतर ते प्रत्येक विभागात लक्ष टाकण्यास गेले. प्रथम त्यांनी बांधकाम व पाणी विभागाला भेट दिली. यावेळी त्यांना कर्मचाऱ्यांची उपस्थिती कमी जाणवली. १०.३० पर्यंत अनेक कर्मचारी आलेच नव्हते.
त्यानंतर त्यांनी शिक्षण विभागाला भेट दिली. तिथेही तीच परिस्थिती होती. शेवटी लेटलतीफ कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला.
पहिल्या टप्प्यात सहा जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांची आढावा बैठक घेऊन त्यांनी कामकाजासंदर्भात सूचना केल्या. शिस्त न पाळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर यापुढे कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.