गेल्या वर्षभरात रत्नागिरी जिल्ह्यात ११३ जणांनी संपविले आयुष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:30 IST2021-04-10T04:30:31+5:302021-04-10T04:30:31+5:30

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील बदलत्या जीवनशैलीचा परिणाम आता हळूहळू जाणवायला लागला असून, गेल्या एक वर्षात तरुणांमध्ये आत्महत्या करण्याचे वाढलेले ...

In the last one year, 113 people lost their lives in Ratnagiri district | गेल्या वर्षभरात रत्नागिरी जिल्ह्यात ११३ जणांनी संपविले आयुष्य

गेल्या वर्षभरात रत्नागिरी जिल्ह्यात ११३ जणांनी संपविले आयुष्य

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील बदलत्या जीवनशैलीचा परिणाम आता हळूहळू जाणवायला लागला असून, गेल्या एक वर्षात तरुणांमध्ये आत्महत्या करण्याचे वाढलेले प्रमाण चिंतेचे कारण ठरत आहे. सन २०१९ व २०२० मध्ये रत्नागिरी जिल्ह्यात एकूण ११३ आत्महत्येच्या घटना घडल्या असून, त्यात १९ ते ४५ वयोगटांतील ७२ जणांचा समावेश आहे.

काेकणात आत्तापर्यंत आधुनिक जीवनशैलीचा फारसा प्रभाव जाणवला नव्हता. चाकोरीबद्ध आयुष्य जगणारा कोकणी माणूस नेहमीच सकारात्मक विचार करणारा आहे. आलेल्या प्रत्येक संकटाचा सामना करण्याची हिंमत कोकणी माणसाकडे नैसर्गिकदृष्ट्या आहे. त्यामुळे आत्महत्येच्या घटना कोकणात फारशा घडत नव्हत्या. उर्वरित महाराष्ट्रमध्ये अतिवृष्टी किंवा दुष्काळामुळे शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढतं. त्यावेळी हवामान बदलामुळे आंबा, काजू, मासळी यांच्या उत्पनावर सातत्याने परिणाम होताना दिसतो. तरीही हतबल झालेला इथला कोकणी माणूस आत्महत्या करताना कधी दिसला नाही. मात्र, गेल्या काही वर्षांपासून कोकणातील जीवनशैलीमध्ये आमूलाग्र बदल घडताना दिसत आहे. या बदलाचे परिणाम युवापिढीवर अधिक होताना दिसत आहेत. हातात आलेली वेगवेगळी गॅजेट्स कदाचित या बदलाचे कारण असावे

.............................

सन २०१९ आणि २०२० या कालावधीत १९ ते ४५ या वयोगटांत वाढलेल्या आत्महत्येचे प्रमाण हे या बदलाचे परिणाम असून, चिंतेत भर टाकणारे आहेत. पोलिसांकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार, सन २०१९ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यात ५८ आत्महत्या झाल्या. त्यापैकी वय वर्ष ८ ते १८ या वयोगटांत ५, १९ ते ३० वर्षे वयोगटांत तब्बल २०, ३१ ते ४५ वयाेगटांत १७, ४५ ते ६० वयोगटांत ९ आणि ६० पेक्षा पुढील वयोगटांत ७ आत्महत्या झालेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहेत.

........................

सन २०२० मध्ये रत्नागिरी जिल्ह्यात ५५ आत्महत्यांची नोंद झाली आहे. त्यामध्ये ८ ते १८ वयोगटांतील ०९, १९ते ३० वयोगटांतील तब्बल २१, ३१ ते ४५ वयोगटांतील १४, ४६ ते ६० वयोगटांतील ४ आणि ६० पेक्षा पुढील वयाच्या ७ लोकांनी २०२० मध्ये आत्महत्या केल्याचं निष्पन्न झाल आहे.

२०२० हे वर्ष लाॅकडाऊन वर्ष संबोधले जाते. त्यामुळे या वर्षात या लाॅकडाऊनचा ताणही मोठ्या प्रमाणावर होता. दरम्यान, या दोन वर्षांत १९ ते ४५ या वयोगटांतील ७२ लोकांनी आत्महत्या केल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. हा वयोगट तरुणांचा वयोगट म्हणून समजला जातो. असं असताना मोठ्या प्रमाणावर तरुणांमध्ये आत्महत्येचं वाढलेले प्रमाण चिंतेचे असून, याबाबत तरुणांमध्ये बदलत्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी त्यांच्यात सकारात्मक वृत्ती जागविण्याची गरज निर्माण झाली आहे.

काेट

तरुणांमधील वाढत्या आत्महत्यांचे प्रमाण नक्कीच चिंताजनक आहे. मात्र, याच वेळी कौटुंबिक सहवास, संवाद, मैत्री आणि बदलत्या शिक्षण पद्धतीचा यात मोठा परिणाम जाणवतो. अशा वेळी प्रत्येकाने आपल्या कुटुंबावर विश्वास ठेवावा आणि बदलत्या परिस्थितीचा सामना सकारात्मक पद्धतीने करावा.

- डाॅ.माेहितकुमार गर्ग, जिल्हा पाेलीस अधीक्षक, रत्नागिरी

Web Title: In the last one year, 113 people lost their lives in Ratnagiri district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.