लाेकमंच - अडगळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:29 IST2021-09-13T04:29:47+5:302021-09-13T04:29:47+5:30

टेक्नॉलॉजी बदलली त्यामुळे कित्येक गोष्टी अडगळीत गेल्या. कोणे एकेकाळी किती हौसेने गोष्टी घेतल्या होत्या. त्या आता कालबाह्य होऊन अडगळ ...

Lakemanch - difficult | लाेकमंच - अडगळ

लाेकमंच - अडगळ

टेक्नॉलॉजी बदलली त्यामुळे कित्येक गोष्टी अडगळीत गेल्या. कोणे एकेकाळी किती हौसेने गोष्टी घेतल्या होत्या. त्या आता कालबाह्य होऊन अडगळ झाल्या आहेत. रेडिओ, टेलिफोन यंत्र, रोल असणारा कॅमेरा, २ इन १, सीडी प्लेयर, ६० व ९० मिनिटाच्या कॅसेटस, किल्लीचे गजराचे घड्याळ, आता सर्व कालबाह्य. आधुनिक साधने आल्यामुळे पाटा-वरवंटा, खलबत्ता, मुसळ अशी साधनं सुद्धा अडगळीत गेली. जाळीच्या कपाटाची जागा आता फ्रीजने घेतली. जुन्या झाल्या म्हणून, त्याच्या जागी आधुनिक गोष्टी आल्या म्हणून, आपण खूप पारंपरिक गोष्टी टाकून देतो. उदाहरण, तांब्या-पितळेची भांडी, बंब, घंगाळ्रे, घागर, गडु, फुलपात्र, प्रवासासाठी फिरकीचा तांब्या, अडकित्ता इ. अशा गोष्टी नंतर बघायलादेखील मिळत नाहीत, अशा पारंपरिक गोष्टींना नंतर aesthetic value येते.

‘अडगळ’ शब्दाचा शब्दकोशातील अर्थ आहे ‘जुने किंवा तुटके, फुटके तसेच अडचण करणारे सामान’. जुने सामान कुणासाठी अडगळ असेल तर घरातील दुसऱ्या कुणासाठी भावनिक मूल्य असलेला ठेवा. खूप साऱ्या आठवणी, भावना गुंतलेल्या असतात काही गोष्टींमध्ये. जुनी कागदपत्रे आवरताना मला माझ्या कॉलेजचे आयडेंटी कार्ड सापडले. १८-१९ वर्षांचा, जाड भिंगाचा चष्मा, केसांची झुलपे मिरवणारा माझा फोटो असलेले कार्ड बघून कॉलेजच्या आठवणींची नुसती गर्दीच गर्दी झाली. टाइम ट्रॅव्हल झालं एकदम. तब्येत खुश झाली.

आता घरांची क्षेत्रफळ संकुचित झालीत. गरजेपेक्षा अधिक सामान असेल की घरात अडचण होते. ‘जी वस्तू गेल्या सहा महिन्यांत लागली नाही, ती खुशाल टाकून द्यावी.’ या नियमानुसार सामानाची विल्हेवाट लावली जाते, ते योग्यच आहे म्हणा. जुन्या गोष्टी साचून राहिल्या तर नवीन गोष्टींना जागा कशी होणार? जुने-पुराणे, फाटकेतुटके सामान घराबाहेर गेलेलेच योग्य नाही का? हे सगळे फक्त वस्तुंबद्दलच लागू नाही बरे. आपल्या मनातील अडगळही नियमितपणे दूर केली पाहिजे. खूप वर्षे जपून ठेवलेला राग, कधीतरी झालेला अपमान, काही गैरसमज आपल्या मनात अडगळ म्हणून साचून राहतात आणि मग आशेचे, आनंदाचे किरण पोहोचण्यासाठी जागाच राहत नाही. मनातील किल्मिषे दूर केली, तर मन कसे चकाचक, शुद्ध आणि हलके होऊन जाते. आपल्या काही धारणा वर्षानुवर्षे घट्ट पकडून ठेवलेल्या असतात. त्या खरं म्हणजे कालबाह्य झालेल्या असतात. त्या धारणा आणि आत्ताचा बदललेला समाजाचा चेहरा अजिबात जुळत नाहीत. आपलाच आपल्याशी संघर्ष होत राहतो. अशा धारणा, असे विचार अडगळ समजून त्रिपुरी पौर्णिमेला नदीपात्रात दिवे सोडतो ना तसेच सोडून द्यावेत. कालपरत्वे मनुष्याची उपयोगीता बदलत जाते. खूप मोठ्या पदावर असणारा अधिकारी कालांतराने रिटायर होतो. अशा वेळेला स्वतःला अडगळ न होऊ देणे हे महत्त्वाचे. झालेले बदल स्वीकारून, सध्याच्या परिस्थितीशी मिळते-जुळते व्यवहार करून, गुण्यागोविंदाने राहणे हेच शहाणपणाचे.

‘‘मी एवढा मोठा अधिकारी होतो आणि आता तू मला काम सांगत आहेस. मी काय गडी आहे का?’’ असा दृष्टिकोन ठेवला तर स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी अडचणीचे होऊ शकते. स्वतःहून म्हणावे, ‘‘आज काय बेत? आज मी अळूची पानं आणतो. खमंग अळूच्या वड्या बनवू आज.’’ मग बघा, आयुष्य कसं सुकर होऊन जातं ते. पाश्चिमात्य देशांमध्ये जुन्या, पारंपरिक गोष्टी जतन केल्या जातात. म्युझियममध्ये ठेवल्या जातात. त्या लोकांना या गोष्टींचे महत्त्व समजलेले आहे. जगभरातील लोक येऊन त्या जुन्या पारंपरिक गोष्टींचे कौतुक करतात. तसं आपल्या इथे का नाही होत? आपण निदान मनातील तरी अडगळ काढून टाकण्याचा प्रयत्न करू.

- डॉ. मिलिंद दळवी, तळगाव, ता. मालवण

Web Title: Lakemanch - difficult

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.