दिवाणखवटी रेल्वे स्थानकाजवळ रूळावर दरड कोसळल्याने कोकण रेल्वेसेवा विस्कळित
By मेहरून नाकाडे | Updated: July 14, 2024 19:48 IST2024-07-14T19:48:08+5:302024-07-14T19:48:32+5:30
कोकण रेल्वे मार्गावर गेल्या आठवड्यात पेडणे बोगद्यात चिखल आल्याने वाहतूक ठप्प झाली होती.

दिवाणखवटी रेल्वे स्थानकाजवळ रूळावर दरड कोसळल्याने कोकण रेल्वेसेवा विस्कळित
रत्नागिरी: मुसळधार पावसाने जिल्ह्याला झोडपले असून त्याचा फटका कोकण रेल्वेलाही बसला आहे. चिपळूण, खेड येथे पाणी भरल्याने रेल्वेच्या गाड्या स्थानकात थांबवून ठेवण्यात आल्या आहेत. दिवाणखवटी स्थानकाजवळ रूळावर दरड कोळल्यामुळे रेल्वेसेवा ठप्प झाली आहे.
कोकण रेल्वे मार्गावर गेल्या आठवड्यात पेडणे बोगद्यात चिखल आल्याने वाहतूक ठप्प झाली होती. चिखलमाती काढून रेल्वेसेवा गुरूवारी (दि.११) रात्रीपासून सुरळित सुरू झाली असताना पावसाने रविवारी (दि.१४) पुन्हा ठप्प झाली आहे. खेड जवळील दिवाणखवटी स्थानकाजवळ बोगद्याच्या तोंडावरच दरड कोसळल्यामुळे रूळावर दगड मातीचा ढीग जमा झाला आहे. त्यामुळे मुंबईकडे जाणारी मांडवी एक्स्प्रेस खेड स्थानकात थांबविण्यात आली आहे. श्री गंगाधर एक्स्प्रेस कामथे स्थानतकात, तेजस व जनशताब्दी एक्स्प्रेस रत्नागिरी तर सावंतवाडी दिवा एक्सप्रेस दिवाणखवटी स्थानकात थांबण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले आहेत.
रविवारी (दि.१४) रोजी सकाळपासूनच पावसाने जोर धरला असल्यामुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक विस्कळित झाले होते. तुतारी एक्स्प्रेस, कोकणकन्या एक्स्प्रेस दोन तास ऊशीराने धावत होत्या तर एर्नाकूलम- हजरत निजामुद्दीन नेत्रावती एक्स्प्रेस तर सात तास ऊशिराने धावत होती. यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.