कोदवली धरणात गाळ, कचरा अन् माती

By Admin | Updated: March 24, 2015 00:11 IST2015-03-23T23:31:46+5:302015-03-24T00:11:38+5:30

नगर परिषद : राजापूरकरांच्या आरोग्याशी पालिकेचा खेळ

Kodavi dam dams, garbage and soil | कोदवली धरणात गाळ, कचरा अन् माती

कोदवली धरणात गाळ, कचरा अन् माती

राजापूर : शहराला नैसर्गिकरित्या पाणीपुरवठा करणाऱ्या कोदवली धरणात गतपावसाळ्यात साचलेला गाळ, माती व कचरा काढण्याकडे पाणीपुरवठा विभागाने पूर्णपणे दुर्लक्ष केले. त्यामुळे धरणातील हा गाळ, कचरा व माती कुजल्याने शहरवासीयांना दुर्गंधीयुक्त गाळमिश्रित पिवळ्या रंगाचे पाणी प्यावे लागत आहे. त्यावर तेलासारख्या द्रवाचा तवंग असल्याची गंभीर बाब सोमवारी पुढे आली आहे.
रविवारी शहरातील एस. टी. डेपो, गुरववाडी, बंगलवाडी व कोदवली पुनर्वसन वसाहतीत गाळमिश्रित पिवळसर पाणी येत असल्याच्या या भागातील नागरिकांच्या तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर सोमवारी उपनगराध्यक्ष रवींद्र बावधनकर यांनी पाणीपुरवठा व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन प्रत्यक्ष कोदवली धरणाला भेट देऊन पाहणी केली आणि धरणातील हे विदारक सत्य पुढे आले आहे. धरणातून शहरात पाणीपुरवठा वाहिन्यांनी येणाऱ्या मुख्य स्रोतावरच हा कुजलेला गाळ, माती व कचरा साचल्याने संपूर्ण कोदवली धरणातील पाण्यात एक वेगळाच तवंग निर्माण झाला आहे. पाण्यात रिकाम्या बाटल्या, प्लास्टिक, जुने कपडे, मोठी लाकडे टाकलेली आढळून आली आहेत.
कोदवली धरणात यावर्षीच्या पावसाळ्यात साचलेला गाळ उपसणे, आतील कचरा काढणे, पाणीपुरवठा वाहिन्यांच्या मुखावरील गाळ बाजुला करणे याबाबत कोणतीच खबरदारी घेण्यात आलेली नाही. पाणीपुरवठा वाहिन्यांची दुरूस्ती, शीळ जॅकवेलकडे शेड व जनरेटर बसविणे यांसह अन्य कामांवर दरवर्षी लाखो रूपये खर्च केले जातात. प्रत्यक्षात मात्र ज्या धरणातून एकही रूपया खर्च करून पाणी आणावे लागत नाही, त्या धरणातील पाणीसाठा टिकून राहावा, शहरवासीयांना स्वच्छ पाणीपुरवठा व्हावा, यासाठी आतील गाळ आणि घाण काढण्यावर कोणतीचे कार्यवाही प्रशासनाकडून केली जात नाही.
गेल्या कित्येक वर्षांत गाळ न उपसल्याने आता धरणाची उंची तळापासून आठ ते दहा फूट इतकीच दिसत आहे. गेले तीन ते चार दिवस एस. टी. डेपो, गुरववाडी, बंगलवाडी व कोदवली पुनर्वसन वसाहतीत गाळ मिश्रित पाणी येत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर सोमवारी उपनगराध्यक्ष रवींद्र बावधकर यांनी प्रत्यक्ष कोदवली धरणाला भेटी दिली व पाहणी केली. जुन्या पाणीपुरवठा वाहिनीवर हा गाळ व कचरा येऊन बसल्याने या वाहिनीकडून शहरात तालीमखाना साठवण टाकीकडे येणारा पाणीपुरवठा बंदच झाला आहे. केवळ नवीन पाणीपुरवठा वाहिनीवरून पाण्याचा पुरवठा सुरू आहे. त्याच्या ठिकाणीही गाळ साचला आहे. मात्र, पावसाळ्यात साचलेला हा गाळ आता धरणातील पाणीसाठा कमी होत आल्याने कुजू लागला असून, त्याला दुर्गंधी येत आहे. त्यामुळे पाणी पिवळसर झाले असून, त्यावर तेलासारखा तवंग आला आहे. हेच पाणी शहरात सोडले जात असून, ते नागरिकांना प्यावे लागत आहे. त्यामुळे या परिसरात साथीचे आजार पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. धरणाची ही दुरवस्था पाहिल्यानंतर बावधनकर यांनी पाणीपुरवठा विभागाचे प्रकाश लोळगे, आरोग्य निरीक्षक किशोर बेलवलकर यांना तत्काळ धरणस्थळी पाचारण केले. धरणातील गाळ आणि कचऱ्याबाबत बावधनकर यांनी यावेळी तीव्र नाराजी व्यक्त करत हा प्रकार नागरिकांच्या जीवाशी खेळण्यासारखा असल्याचे यावेळी नमूद केले. पाणीपुरवठा वाहिन्यांच्या मुखावरील गाळ तत्काळ काढून वाहिन्या मोकळ्या करतानाच धरणातील कचरा काढण्याची मागणी बावधनकर यांनी केली. नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांना बोलावून या विभागाने गाळ काढण्याचे काम तत्काळ हाती घेण्यात आले आहे. सोमवारी उपनगराध्यक्षांसह पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी प्रत्यक्ष धरणाची पाण्याच्या पातळीची स्वत: पहाणी केल्यानंतर हे पाणी दूषित असल्याची खात्री झाली आहे. त्यामुळे या पाण्याचे नमूने घेऊन ते तपासणीसाठी रत्नागिरीत पाठविण्यात आल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाच्या वतीने देण्यात आली. (प्रतिनिधी)


पाणी आहे पण...
प्रदूषण ‘लय भारी’
गाळ उपसण्याबाबत नियोजन करून व निधीची तरतूद करून काम करण्याचे वारंवार निश्चित केलेले असतानाही पाणीपुरवठा विभागाला मात्र त्याचे काहीच पडलेले नाही, अशी परिस्थिती धरणातील पाणी पाहिल्यावर दिसून येते, अशी टीका बावधनकर यांनी केली आहे.

पाणी दूषित असताना व नागरिकांच्या तक्रारी झालेल्या असतानाही सोमवारी या भागात याच दूषित पाण्याचा पुरवठा करण्यात आला आहे. पाणीपुरवठा समिती बैठकीत पाणीपुरवठा विभागाशी संबंधीत विविध कामांच्या निविदांना व प्रस्तावांना मंजूरी घेतल्या जातात. मात्र, कोदवली धरणात साचलेला हा गाळ काढण्याकडे या विभागाने सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे.


पाणीपुरवठा विभागाच्या या गलथान कारभारामुळेच आज धरणातील पाणी कमी होताच गाळ वर आला व कुजू लागला असून, शहरवासीयांना दुर्गंंधीयुक्त दूषित पाणी प्यावे लागत आहे. हा प्रकार नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा असून, यामुळे आजारांचा फैलाव झाला तर त्याची जबाबदारी ही पाणीपुरवठा विभागाची राहील, असा ईशाराही बावधनकर यांनी दिला आहे.

Web Title: Kodavi dam dams, garbage and soil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.