चिपळुणातील अतिक्रमण रोखण्यासाठी ठोकले पत्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2020 17:56 IST2020-11-30T17:55:08+5:302020-11-30T17:56:53+5:30
chiplun, nagarpalika, muncipaltycarporation, ratnagirinews शहरात पुन्हा-पुन्हा होणाऱ्या अतिक्रमणांवर चिपळूण नगर परिषदेने आता जालीम उपाय शोधला आहे. शहरात रस्त्याच्या कडेला थेट पत्रे मारून अतिक्रमण करण्याला पायबंद घातला जात आहे. त्यामुळे रस्ते मोकळे झाले असून, फेरीवाल्यांना पत्रा हद्दीच्या आतमध्ये व्यापार करण्यास मुभा देण्यात आली आहे. या युक्तीमुळे शहरातील वाहतूक कोंडीची समस्याही काही प्रमाणात सुटणार आहे.

चिपळुणातील अतिक्रमण रोखण्यासाठी ठोकले पत्रे
अडरे : शहरात पुन्हा-पुन्हा होणाऱ्या अतिक्रमणांवर चिपळूण नगर परिषदेने आता जालीम उपाय शोधला आहे. शहरात रस्त्याच्या कडेला थेट पत्रे मारून अतिक्रमण करण्याला पायबंद घातला जात आहे. त्यामुळे रस्ते मोकळे झाले असून, फेरीवाल्यांना पत्रा हद्दीच्या आतमध्ये व्यापार करण्यास मुभा देण्यात आली आहे. या युक्तीमुळे शहरातील वाहतूक कोंडीची समस्याही काही प्रमाणात सुटणार आहे.
शहरातील वाढते अतिक्रमण पाहता चिपळूण नगर परिषदेने शहरात अतिक्रमण हटाव मोहीम युद्धपातळीवर राबवून खोके, हातगाड्या, शेड आणि काही बांधकामे जमीनदोस्त केली. याला व्यापाऱ्यांनी आक्षेप घेतल्यानंतरही नगर परिषद प्रशासनाने आपली ही मोहीम सुरूच ठेवली. काही दिवसांनी शहरातील भोगाळे ते बसस्थानक परिसरात पुन्हा अतिक्रमण झाले.
याठिकाणी अनधिकृत खोके आणि हातगाड्या पुन्हा उभ्या राहिल्या. त्यामुळे रस्त्याच्या कडेला आवश्यक तेवढी जागा सोडून थेट पत्रे ठोकून अतिक्रमणाला पायबंद घालण्याची मोहीम शनिवारी हाती घेण्यात आली. अतिक्रमण हटाव पथकाचे संदेश टोपरे, विनायक सावंत यांच्या उपस्थितीत पालिका कर्मचाऱ्यांनी रस्त्याच्या कडेला पत्रे ठोकून जागा आरक्षित करण्यास सुरुवात केली.
यावेळी सुरुवातीला व्यापाऱ्यांचा काहीसा विरोध झाला. परंतु, ही व्यवस्था व्यावसायिकांच्याही सोयीची असल्याचे टोपरे यांनी पटवून दिल्यानंतर विरोध मावळला. पत्रा हद्दीच्या आतमध्ये व्यावसायिकांना व्यापार करण्यास मुभा देण्यात आली आहे. मात्र, त्याबाहेर कोणालाही व्यापार करता येणार नाही. तसे आढळल्यास कारवाई केली जाणार असल्याची माहितीही टोपरे यांनी दिली.
चिपळूण नगर परिषदेने हाती घेतलेल्या या मोहिमेचा सर्वांनाच फायदा होणार आहे. यामुळे शहरातील मुख्य रस्ता मोकळा राहणार असून, वाहतुकीची समस्याही काही प्रमाणात सुटणार आहे. तसेच फेरीवाले व व्यावसायिकांनाही याचा फायदा होणार असल्याने त्यांच्याकडून नगर परिषदेच्या या मोहिमेचे स्वागत केले जात आहे. भोगाळे ते बसस्थानक बुरुमतळी या मुख्य रस्त्याच्या कडेला पत्रे ठोकण्याची मोहीम शनिवारी दिवसभर कर्मचाऱ्यांकडून राबवली जात होती.