खेड : मुंबई - गोवा महामार्गावरील कशेडीच्या दोन्ही बोगद्यांतील वाहतूक येत्या मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू करण्याचे नियोजित असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली.महामार्गच्या पळस्पे ते हातखंबा या टप्प्यातील कामाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी ते गुरुवारी आले हाेते. यावेळी त्यांनी गुरुवारी रात्री उशिराने खेड तालुक्यातील कशेडी बोगद्याची पाहणी केली. कशेडी बोगद्यातील काम पाहिल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.मंत्री भाेसले यांनी सांगितले की, मुंबई-गोवा महामार्गावरून पूर्ण क्षमतेने वाहतूक सुरू करण्यासाठी या महामार्गाचे अपूर्ण काम लवकरात लवकर व दर्जेदार व्हावे यासाठी केंद्रीय बांधकाममंत्री नितीन गडकरी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बारकाईने लक्ष ठेवून आहेत. बोगद्याच्या काही भागात गळती लागली असून, याबाबत योग्य त्या उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन मंत्री भोसले यांनी दिले.सद्यस्थितीत पहिल्या बोगद्यातून वाहतूक सुरू आहे. बोगद्याला जोडणारे दोन्ही बाजूकडील दुपदरी रस्ते जवळपास पूर्णत्वाला गेले असले तरी काही कामे अपूर्ण आहेत. गणेशोत्सव कालावधीत दुसऱ्या बोगद्याची एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आली होती. मात्र, उत्सव कालावधीनंतर पुन्हा बंद करण्यात आली.यानंतर दिवाळी, वर्ष अखेर आणि नववर्षाच्या सुरुवातीला या दोन्ही बोगद्याची अपुरी कामे पूर्ण करून वाहतुकीला बोगदे सुरू होतील, असे आश्वासन महामार्ग विभागाकडून देण्यात आले होते. मात्र, ते पूर्ण झालेले नाही. त्यामुळे मंत्री भाेसले यांनी या कामाची पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
गळतीचा काेणता धाेका नाहीजुन्या बाेगद्याला जिथे गळती हाेती ती काढण्यात आली आहे. काही ठिकाणी अजूनही गळती सुरू असून, त्यावर नवीन तंत्रज्ञान वापरून उपाययाेजना केल्या जात आहेत. गळती थांबविण्यासाठी सर्वताेपरी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, या गळतीमुळे काेणाताही धाेका नसल्याचे मंत्री भाेसले यांनी सांगितले.