समाजभवनासाठी कसली कंबर

By Admin | Updated: October 13, 2016 23:50 IST2016-10-13T23:50:18+5:302016-10-13T23:50:18+5:30

धनगर समाजाची बैठक : मुंबईतील बैठकीत आरक्षणाच्या अंमलबजावणीबाबत चर्चा

Kambli Waambar | समाजभवनासाठी कसली कंबर

समाजभवनासाठी कसली कंबर

आरवली : संगमेश्वर तालुक्यातील ३२ धनगरवाड्यांमधील मुंबईस्थित धनगर बांधवाची दादर येथील शिवाजी विद्यालयात दिनांक १६ आॅक्टोबर रोजी महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत धनगर आरक्षण अंमलबजावणी आणि संगमेश्वर तालुक्यात समाजभवन उभारण्याबाबत चर्चा होणार आहे. या बैठकीला धनगर समाजातील सर्व कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आल्याची माहिती संघटनेतर्फे देण्यात आली आहे.
धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत अंमलबजावणी करण्याचे आश्वासन युती सरकारमधील भाजप नेत्यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी दिले होते. सरकार सत्तेत येऊन दोन वर्ष होत आली तरीही धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीबाबत अद्याप कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे समाजाने नाराजी व्यक्त केली आहे. धनगर समाजाला नव्याने आरक्षण नको असून, राज्य घटनेनुसार धनगर समाजाचा (एस. टी.)मध्ये समावेश आहे. मात्र, याची अंमलबजावणी सरकारने करावी, अशी मागणी समाजाच्यावतीने सरकारकडे करण्यात येत आहे.
संगमेश्वर तालुक्यात धनगर समाजभवन उभे राहावे, यासाठी समाजाने आता कंबर कसली आहे. गेल्यावर्षी देवरुख येथे झालेल्या तालुका धनगर समाज सत्कार सोहळ्यात खासदार विनायक राऊत यांनी समाज भवनासाठी निधी उपलब्ध करून देतो, असे आश्वासन दिले होते. मात्र, अद्यापही या आश्वासनाची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे धनगर समाजाला समाज भवनाची प्रतीक्षा कायम आहे. समाजाने आता स्वत:च पुढाकार घेत समाजभवन उभे करण्याचा संकल्प केला आहे. या समाज भवनासाठी आता धनगर समाजातील मुंबई आणि पुणे येथे असणारे समाजबांधव पुढाकार घेणार आहेत. यासाठी रविवार, दि. १६ आॅक्टोबर रोजी धनगर समाजबांधवाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
मुंबई येथे आयोजित या बैठकीला संगमेश्वर तालुक्यातून संतोष येडगे, तुकाराम येडगे, बबन झोरे, दत्ताराम शेळके, सुरेश बावदाने, सुनील बोडेकर, प्रकाश पांढरे, भागोजी वरक, विठोबा फोंडे, लक्ष्मण झोरे, शांताराम शेळके, तानाजी कोळापटे, उपस्थित राहणार आहेत. (वार्ताहर)
प्रतिनिधित्व देण्यात दुर्लक्ष : निवडणुकीत पक्षाला पाठिंबा देण्याबाबत होणार चर्चा
संगमेश्वर तालुक्यात तसेच रत्नागिरी जिल्ह्यात धनगर समाज निर्णायक भूमिकेत आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत धनगर समाजाला प्रतिनिधित्व देण्यात राजकीय पक्षांनी दुर्लक्ष केले आहे. तसेच धनगर समाजातील पदाधिकाऱ्यांचा निवडणुकीपुरता वापर करुन घेतला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत धनगर समाजाला ज्या पक्षाकडून प्रातिनिधीक स्वरुपात न्याय मिळेल, त्या पक्षाला पाठिंबा देण्याबाबत धनगर समाजातील पदाधिकारी निर्णय घेणार असल्याची चर्चा आहे. या बैठकीत आगामी निवडणुकीबाबतदेखील चर्चा करण्यात येणार आहे. निवडणुकीत कोणत्या पक्षाला पाठिंबा द्यायचा याबाबतही चर्चा करून पुढील दिशा ठरविण्यात येणार आह

Web Title: Kambli Waambar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.