चिपळुणात दहीहंडीचा आनंद थराराविनाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:07 IST2021-09-02T05:07:31+5:302021-09-02T05:07:31+5:30
चिपळूण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दहीहंडीवर घातलेले निर्बंध आणि महापुराचा चिपळूण शहराला बसलेला भयानक तडाखा यामुळे चिपळुणात मंगळवारी ...

चिपळुणात दहीहंडीचा आनंद थराराविनाच
चिपळूण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दहीहंडीवर घातलेले निर्बंध आणि महापुराचा चिपळूण शहराला बसलेला भयानक तडाखा यामुळे चिपळुणात मंगळवारी दहीहंडीचा थरार अनुभवता आला नाही. आयोजकांनी दहीहंडी उत्सव कार्यक्रम रद्द केला. मात्र, काही ठिकाणी बाळगोपाळांनी पारंपरिक व साध्या पध्दतीने दहीहंडी उत्सव साजरा केला.
गेल्या दोन वर्षांपासून देशावर कोरोनाचे सावट आहे. यामुळे प्रत्येकवेळी शासनाला सणावेळी निर्बंध घालण्याची वेळ येते. चिपळूण शहरासह ग्रामीण भागात दरवर्षी गोकुळाष्टमीचा उत्सव साजरा केला जातो. नाक्यानाक्यावर आणि गल्लोगल्ली साजरा होणारा दहीहंडीचे सण गोविंदा पथकांसह तरुणाईसाठी पर्वणीच असते. लाऊडस्पीकरवरील गाण्याची धमाल, पारंपरिक वाद्यांचा जल्लोष, सिनेअभिनेते यांच्या उपस्थितीत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल, पाण्याचा वर्षाव यामध्ये गोविंदा पथकांच्या दहीहंडीचा थरार नागरिकांना पाहायला मिळतो. यामुळे चिपळूण बाजारपेठ ग्रामीण भागातील नागरिकांची दहीहंडी पाहण्यासाठी मोठी गर्दी होते. राजकीय पक्षांसह मंडळे दहीहंडीचे आयोजन करून बक्षिसे लावत असतात.
यावर्षी कोरोनाचे सावट आणि महापुराचा बसलेला फटका यामुळे राजकीय पक्षांसह मित्रमंडळांनी स्वतःहून दहीहंडी उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला. यामुळे दहीहंडीचा थर पहायला मिळाला नाही. मात्र, दुसरीकडे काही ठिकाणी बाळगोपाळांनी दहीहंडी उत्सव साजरा करून आनंद लुटण्याचा प्रयत्न केला. काही मंदिरांत उंचावर दहीहंडी न बांधता ठरावीक लोकांच्या उपस्थितीत या उत्सवाची परंपरा जपली. यानिमित्ताने शहरात काही ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.