विहिरीत उडी मारुन चिमुकल्याला जीवदान
By Admin | Updated: November 6, 2014 22:07 IST2014-11-06T21:18:18+5:302014-11-06T22:07:15+5:30
ऐमान खानचे कौतुक : इशानसाठी लावली जिवाची बाजी

विहिरीत उडी मारुन चिमुकल्याला जीवदान
एजाज पटेल - फुणगूस -सुमारे १५ फूट खोलीच्या पाण्याने तुडुंब भरलेल्या विहिरीत पडलेल्या एका पाच वर्षीय मुलाला स्वत:च्या जिवाची पर्वा न करता विहिरीत उडी मारुन वाचवण्याऱ्या ऐमान इजियास खान (फुणगूस, ता़ संगमेश्वर) याच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे़ -फुणगूस खाडी भागातील कोंड्ये मुस्लिम मोहल्ला येथे ही घटना नुकतीच घडली़ इशान इम्रान बोदले खेळत असताना त्याचा अचानक पाय घसरुन तो थेट अर्धवट कठडा बांधलेल्या विहिरीत कोसळला़ ही विहीर पूर्णपणे पाण्याचे भरलेली आहे़ इशान विहिरीत कोसळल्याचे काही अंतरावर उभ्या असलेल्या आयशा नावाच्या चिमुरडीने पाहिले़ त्यानंतर तिने आरडा-ओरडा सुरु करताच आजूबाजूच्या महिलांनी विहिरीच्या दिशेने धाव घेतली़ त्यावेळी इशान गटांगळ्या खात असल्याचे पाहताच महिलांनीही धावा, वाचवा असा आक्रोश केला़ त्यावेळी जवळच्या घरामध्ये पुरुष मंडळी कोणीही नव्हती. त्यामुळे कोणालाच काही सुचेनासे झाले होते़ तरीही आरडाओरडा सुरुच होता़
त्यावेळी ऐमान खान व साकीब खान हे दोघेजण दुचाकीवरुन चालले होते़ महिलांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून त्यांनी आपली दुचाकी आवाजाच्या दिशेने वळवली़ त्यानंतर त्यांनी तत्काळ महिला आक्रोश करीत असल्याच्या ठिकाणी दुचाकी बाजूला लावून धाव घेतली़ समोरच इशांत हा विहिरीत गटांगळ्या खात असल्याचे पाहिले़ त्यावेळी ऐमान याने काहीही विचार न करता थेट विहिरीत झेप घेतली़ विहिरीच्या तळाशी जात असलेल्या इशानला त्याने चुटकीसरशी बाहेर काढले़ त्यानंतर आरडाओरड करीत असलेल्या महिलांनी सुटकेचा श्वास घेतला़
ऐमान व साकीब यांच्या धाडसामुळे इशानचा जीव वाचला़ त्यामुळे या दोघांचेही फुणगूस परिसरात कौतुक केले जात आहे. ऐमान व साकीब यानी दाखविलेल्या धाडसामुळेच इशानचे प्राण वाचल्याने त्यांचे कौतुक होत आहे.
स्वत:च्या जिवाची पर्वा न करता दाखविले धाडस.
कोंड्ये फुणगूस खाडी भागातील प्रकार.
परिसरातील महिलांनी केली आरडाओरड.
दुचाकीवरील ऐमानने प्रसंगावधान दाखवत प्राण वाचवले.
सुरक्षेचा प्रश्न येणार ऐरणीवर.