रत्नागिरी : अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात २७ रोजी जेलभरो आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 17:00 IST2018-08-17T16:57:51+5:302018-08-17T17:00:56+5:30
रिफायनरीचा निर्णायक लढा सुरु असतानाच आता अणुऊर्जा प्रकल्पाच्या आंदोलनाने दुसऱ्या इनिंगला सुरूवात केली आहे. जनहक्क समितीच्या नेतृत्वाखाली सोमवार, दिनांक २७ आॅगस्टला जेलभरो आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जनहक्क समितीच्या पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

रत्नागिरी : अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात २७ रोजी जेलभरो आंदोलन
राजापूर : रिफायनरीचा निर्णायक लढा सुरु असतानाच आता अणुऊर्जा प्रकल्पाच्या आंदोलनाने दुसऱ्या इनिंगला सुरूवात केली आहे. जनहक्क समितीच्या नेतृत्वाखाली सोमवार, दिनांक २७ आॅगस्टला जेलभरो आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जनहक्क समितीच्या पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
तालुक्यात सर्वात प्रथम जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प तत्कालीन काँग्रेसप्रणित आघाडी शासनाच्या काळात आणण्यात आला. देशातील सर्वात मोठा असा हा १० हजार मेगावॅट अणुऊर्जा निर्मिती करणारा प्रकल्प आहे. त्यामधून होणारे रेडीएशनमुळे तालुक्यातील निसर्गसंपदा, भातशेती, बागायती, मच्छिमारी यासहित मानवी जीवनावर त्याचे विपरीत परिणाम होतील.
या भीतीपोटी प्रकल्पग्रस्त परिसरातून मागील काही वर्षे या विरोधात लढा सुरु आहे. मागील एक दशकाच्या कार्यकालात अनेक आंदोलने कोकणभूमीने पाहिली आहेत. प्रशासन व स्थानिक प्रकल्पग्रस्त जनता यांच्यात अनेकवेळा संघर्ष झाला होता. काही आंदोलने हिंसक बनली होती. एका आंदोलनादरम्यान तर पोलिसांकडून झालेल्या गोळीबारात तबरेज सायेकर हा आंदोलक गोळी लागून मृत्युमुखी पडला होता.
युक्रेनमधील चर्नोबिलव अलिकडे जपानमधील फुकुशिमा येथे अणुऊर्जा प्रकल्पांतर्गत झालेल्या दुर्घटनेत मोठ्याप्रमाणावर किंमत मोजावी लागली होती. त्यामुळे हानीकारक असा जैतापूर प्रकल्प रद्द करावा, अशी जोरदार मागणी कायम आहे. तरीदेखील या प्रकल्पाचे काम सुरू असल्याने शासनाच्या या निर्णयाविरोधात प्रकल्पग्रस्तांनी आता जेलभरो आंदोलनाची हाक दिली आहे. प्रकल्पाला विरोध करण्यासाठी कार्यरत असलेल्या जनहक्क समितीच्या नेतृत्वाखाली २७ आॅगस्ट रोजी जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे.
समितीचे अध्यक्ष सत्यजीत चव्हाण, उपाध्यक्ष मन्सुर सोलकर, मच्छिमार नेते अमजद बोरकर, नदीम तमके, फकीर सोलकर यासहित बहुसंख्य प्रकल्प विरोधक या जेलभरो आंदोलनात सहभागी होणार आहेत. मागील काही महिन्यांत रिफायनरी विरोधात आंदोलने सुरु असताना आता अनेक महिने थंड असलेले जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधी जेलभरो आंदोलन पुकारण्यात आल्याने जैतापूरचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.