जाधव-कदम गट निकमांसाठी एकत्र तरीही...
By Admin | Updated: October 21, 2014 23:44 IST2014-10-21T22:24:14+5:302014-10-21T23:44:52+5:30
कटुता अगर पक्षविरोधी काम केल्याची चर्चा नव्हती किंवा तसे आढळले नाही. तरीही निकम यांचा पराभव टळला नाही.

जाधव-कदम गट निकमांसाठी एकत्र तरीही...
चिपळूण : कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांना निवडून आणायचेच असा चंग बांधून राष्ट्रवादी काँग्रेसमधील एकमेकांचे पारंपरिक विरोधक आमदार भास्कर जाधव व माजी आमदार रमेश कदम यांचे गट एकत्र काम करीत होते. तरीही पक्षाला अपयश आले. याचे शल्य अनेकांच्या उरी राहिले आहे.राजकारणाच्या पलिकडे समाजकारण जपणाऱ्या शेखर निकम यांच्यासारख्या कार्यकर्त्याला पक्षाध्यक्ष शरद पवार व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेसाठी संधी दिली. कोणत्याही परिस्थितीत निकम निवडून आले पाहिजेत, असे आदेश नेत्यांना देण्यात आले होते. २००९ च्या निवडणुकीतील १८ हजाराचे शिवसेना युतीचे मताधिक्य व लोकसभेचे मोदी लाटेतील ३१ हजाराचे मताधिक्य कमी करुन प्रतिस्पर्धी उमेदवारावर मात करायची होती. हे काम अवघड होते. पण अशक्य नव्हते. शिवसैनिकांमध्ये जी रग असते, जी इर्षा असते ती राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळत नाही. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पक्षनिष्ठेने काम करण्यापेक्षा उमेदवार कोण, आपल्याला कोणी बोलवले नाही, आपल्याला कोण विचारत नाही अशा अनेक नकार घंटा वाजवत असतात.
या निवडणुकीत मात्र निकम यांच्यासाठी कदम व जाधव या दोन्ही गटाचे कार्यकर्ते कार्यरत होते. कोठेही कटुता अगर पक्षविरोधी काम केल्याची चर्चा नव्हती किंवा तसे आढळले नाही. तरीही निकम यांचा पराभव टळला नाही. यावेळी राष्ट्रवादीचे सर्व गट-तट एकत्र होते. शिवाय सक्षम उमेदवार पक्षाने दिला होता. उमेदवार म्हणून जे जे काही करायचे ते निकम यांनी केले होते. कोणत्याही आघाडीवर निकम स्वत: कमी पडले नव्हते. प्रचारासाठीही त्यांनी स्वतंत्र यंत्रणा राबविली. परंतु, आम्ही असताना तुमची माणस कशाला असे सांगून काही पदाधिकाऱ्यांनी निकम यांना निश्चिंत केले. पदाधिकाऱ्यांवर विश्वास ठेवून निकम यांनी आपल्या कार्यकर्त्यांना अन्य भागाकडे वळविले. हा विश्वासच निकम यांना काही प्रमाणात त्रासदायक ठरला. अशी जबाबदारी घेणारे नेते व कार्यकर्ते काँग्रेसी स्टाईलने काम करीत राहिले. त्यांनी काम केले परंतु, त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. सक्षम उमेदवार व संपूर्ण यंत्रणा हातात असताना कार्यकर्त्यांनी चौफेर काम करायला हवे होते. तरच राष्ट्रवादीला पुन्हा विजय मिळविता आला असता. कारण प्रतिस्पर्धी उमेदवार शिवसेनेचे आमदार सदानंद चव्हाण हेही तोडीसतोड व निष्कलंक चारित्र्याचे होते. त्यांच्यावर कोणताही आरोप किंवा डाग नव्हता याचे भान कार्यकर्त्यांनी राखणे गरजेचे होते.
राष्ट्रवादीला चिपळूणमध्ये जे मताधिक्य मिळाले त्यात वैयक्तिक योगदान मोठे होते. या मतदारसंघात निवडणूक लढविताना पूर्वीचे मताधिक्य कमी करणे शक्य नाही. परंतु, निकम यांनी आपली कोरी पाटी व आतापर्यंतच्या कामाच्या पुण्याईवर चुरशीची लढत दिली. (प्रतिनिधी)