रिफायनरी प्रकल्पाच्या जमीन व्यवहारांची चौकशी करा : राजन साळवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 16:50 IST2018-07-21T16:46:36+5:302018-07-21T16:50:31+5:30
नागपूर अधिवेशनात नाणार येथील रिफायनरी पेट्रोकेमिकल प्रकल्पाबाबत पुन्हा एकदा औचित्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.

रिफायनरी प्रकल्पाच्या जमीन व्यवहारांची चौकशी करा : राजन साळवी
राजापूर : नागपूर अधिवेशनात नाणार येथील रिफायनरी पेट्रोकेमिकल प्रकल्पाबाबत पुन्हा एकदा औचित्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. रिफायनरी प्रकल्पाच्या नियोजित जागेच्या ठिकाणी परराज्यातील व्यक्तींनी मोठ्या प्रमाणात खरेदी केलेल्या जमीन व्यवहारांची सरकारकडून चौकशी करण्याबाबत व खरेदीखत रद्द करण्याबाबत आमदार राजन साळवी यांनी सभागृहामध्ये प्रभावितपणे मांडून शासनाचे लक्ष वेधून घेतले.
नागपूर येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात आमदार साळवी यांनी औचित्याच्या मुद्द्याखाली बोलताना स्पष्ट केले की, राजापूर तालुक्यात होऊ घातलेल्या केंद्र सरकारच्या रिफायनरी प्रकल्पासाठी जवळजवळ २२०० एकर जमीन खरेदी केलेली आहे. त्यामध्ये परराज्यातील व्यक्तींनी सदर जागा खरेदी केल्याचे निदर्शनाला आले असल्याचे राजन साळवी यांनी सांगितले.
त्यामध्ये प्रामुख्याने गुजरात राज्यातील गौरव जैन, दीपेन मोदी, पुनीत वाघवा, प्राची त्रिपाठी, सतीश केडिया, हिमांशू निलावार, दिनेश शहा, संतोष कटारिया, नंदकुमार चांडक, अमित ठावरी, रमाकांत राठी, मनीष झुनझुनवाला, संजय दुधावत, अस्मिता मांगुकिया अशा एकशे दहा व्यक्ती असल्याचे निदर्शनास आले असल्याचे साळवी यांनी सांगितले.
या सर्वांनी शेतकरी असल्याचा दाखला न घेता खरेदीखत केल्याची बाब पुढे आली आहे. या खरेदी केलेल्या जमीन व्यवहाराची चौकशी करण्यात येउन गैरव्यवहारामधील दोषींना शिक्षा करण्यात यावी व खरेदीखत रद्द करण्यात यावी अशी मागणी केली.