प्री, पोस्ट वेडिंंगवर लक्षवेधी छायाचित्र
By Admin | Updated: November 15, 2015 23:56 IST2015-11-15T21:33:56+5:302015-11-15T23:56:29+5:30
परेश राजिवले : रत्नागिरीत भरणार आगळे प्रदर्शन

प्री, पोस्ट वेडिंंगवर लक्षवेधी छायाचित्र
रत्नागिरी : छायाचित्र हे आपल्या जीवनातून निसटून जाणाऱ्या आणि खऱ्या क्षणांचे सोबती असतात. आपल्या आयुष्यातील महत्त्वाचे क्षण अगदी आधुनिक पद्धतीने चित्रीत केल्यामुळे त्यातील प्रेम आणि आनंद द्विगुणित होत असतो. अर्थात ते काम छायाचित्रकाराचे असते. अशाच वेगळ्या पद्धतीने प्री आणि पोस्ट वेडिंंगवर आधारित छायाचित्रण करणाऱ्या परेश राजिवले या तरुणाने आपली वैविध्यपूर्ण फोटोग्राफी प्रदर्शनाच्या माध्यमातून लोकांसमोर आणली आहे.
पऱ्याची आळी येथील सोहम् आर्केड अपार्टमेंटमध्ये असलेल्या आपल्या स्मार्ट फोटो स्टुडिओमध्ये त्याने हे प्रदर्शन १७ नोव्हेंबर रोजी आयोजित केले आहे. आज फोटोग्राफीमध्ये अत्याधुनिक साधनसामुग्री, अद्ययावत कॅमेरे आणि नव्या प्रकारच्या लेन्सने बहर आणली आहेत. योग्य ज्ञान, वैविध्यपूर्ण अँगल्स, नवनिर्मिती आणि नवसंकल्पना या सर्व गोष्टी घेऊन परेश राजिवले या तरुणाने फोटोग्राफी क्षेत्रात आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे. स्टुडिओच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त परेशने प्री वेडिंंग आणि पोस्ट वेडिंग अशा विषयाचे एक आगळे प्रदर्शन भरवले आहे. विविध मूडमध्ये हे फोटो टिपण्यात आल्याने दर्शक हे विविध फोटो पाहण्यात गुंग होउन जातो.
नव्या जमान्यानुसार आजची पिढी लग्नाआधीचेही सोबतचे सुखद क्षण कॅमेऱ्याद्वारे टिपून अविस्मरणीय करू इच्छिते. तसेच लग्नावेळची आणि लग्नानंतरचेही जवळीकतेचे क्षण त्यांना अलबमद्वारे कायमचे जपून ठेवायचे असतात. म्हणूनच प्री आणि पोस्ट वेडिंग हा उत्तम पर्याय असू शकतो. याच विषयावर छायाचित्र प्रदर्शनाद्वारे परेश आपली वेगळी फोटोग्राफी रत्नागिरीकरांसमोर ठेवणार आहे. परेशने प्री वेडिंंग व पोस्ट वेडिंंग संकल्पनेलाही रत्नागिरीत वेगळा आयाम दिला आहे. रत्नागिरीतील पर्यटनस्थळांना त्याने या नवदाम्पत्यासोबत टिपून एक रत्नागिरीच्या पर्यटनालाही खुलविण्याचा प्रयत्न केला आहे.
याचबरोबर नवदाम्पत्याच्या चेहऱ्यावरील आनंदाचे भाव टिपण्याबरोबर त्यांचे वैविध्यपूर्ण अँगल्सने टिपलेले फोटो अधिक वैशिष्ट्यपूर्ण आहेत. या प्रदर्शनात परेश असे खास फोटो मांडणार आहे. १७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते १० यावेळेत हे प्रदर्शन समस्त रत्नागिरीकरांसाठी खुले असणार आहे. (प्रतिनिधी)